Pimpri News : इंग्लंडहून शहरात आलेले आणखी 6 प्रवासी ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, 267 प्रवाशांचा शोध

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसचा इंग्लंडमध्ये नवा स्ट्रेन आढळून आला आहे. त्यामुळे इंग्लंडहून भारतात आलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. महाराष्ट्रात मुंबई विमानतळावर आलेल्या प्रवाशांची यादी राज्यातील प्रत्येक महानगरपालिकांना पाठवण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीमध्ये इंग्लडहून 267 प्रवासी आल्याचे समोर आले आहे. त्यापैकी एका 35 वर्षीय युवकाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता. आता आणखी सहा जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

इंग्लंडहून आलेल्या एकूण 267 प्रवाशांचा आतापर्यंत शोध घेण्यात आला आहे. त्यातील 18 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये 156 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर 26 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. शहरात दिवसभरात 167 जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर 2133 संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झाले आहेत. तसेच दिवसभरात 1687 जणांचे कोरोना तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

बुधवारी दिवसभरात 1389 जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल प्रलंबित आहेत. रुग्णालयातून 2157 जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर 460 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 96 हजार 483 वर पोहचली आहे. आज 198 रुग्णांची दुसऱ्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 93 हजार 305 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.