Coronavirus : इंग्लंडहून पिंपरी-चिंचवडमध्ये परतलेले दोन प्रवासी ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये इंग्लंडहून परतलेल्या 215 प्रवाशांचा शोध घेण्यात आला आहे. त्यापैकी 167 प्रवाशांची कोरोना तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 112 जणांचा अहवाल मंगळवारी निगेटिव्ह आला आहे. तर दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच 53 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होत आहे. मंगळवारी 121 नवीन कोरोना (CoronaVirus) पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 156 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 1790 संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झाले आहेत. तर दिवसभरात 1401 जणांची कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकिय विभागाने दिली आहे.

शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 96 हजार 316 वर पोहचली आहे. आज 156 रुग्णांची दुसऱ्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 93 हजार 107 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मंगळवारी दिवसभरात 1110 जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल प्रलंबित आहेत. रुग्णालयातून 1823 जणांना घरी सोडण्यात आले तर 644 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. शहरात रुग्णांची संख्या घटत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले आहे.

गेल्या 24 तासामध्ये शहरात 3 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 1 तर हद्दीबाहेरील 2 रुग्णांचा समावेश आहे. आज मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये सांगवी, मावळ, खेड येथील रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत शहरात 2474 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून यामध्ये 1752 शहरातील तर 722 पालिका हद्दी बाहेरील आहेत. सध्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये 644 रुग्ण ॲक्टिव्ह (Active) असून त्यांच्यावर शहरातील कोव्हिड केअर सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. पिंपरी महापालीका हद्दीबाहेरील 70 रुग्णांवर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर पिंपरी चिंचवडमधील 83 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.