Sassoon Hospital : 5 महिन्यांनंतर ससूनमधील ‘कोरोना’ रुग्ण 100 पेक्षा कमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मागील 7 महिन्यात खऱ्या अर्थानं जम्बो रुग्णालय ठरलेल्या ससून रुग्णालयातील कोविड सेंटरमधील रुग्णांची संख्या शंभरच्या खाली आली आहे. मागील 5 महिन्यांत पहिल्यांदाच एवढी सुसह्य स्थिती निर्माण झाल्याचं दिसत आहे. त्यामुळं आता येथील डॉक्टर आणि नर्स यांच्यावरील ताण कमी झाला आहे. मंगळवार (दि 13) पर्यंत रुग्णालयात एकूण 4 हजार 358 कोरोनाबाधित रुग्ण दाखल झाले होते. त्यापैकी 2 हजार 588 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत अशी माहिती समोर आली आहे.

ससून रुग्णालयाच्या जुन्या इमारतीत मार्च महिन्याच्या अखेरीस कोरोनाचा लागण झालेले म्हणजे कोरोनाबाधित रुग्ण दाखल होण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर 15 दिवसांतच 11 मजली नवीन इमारतीत कोविड रुग्णालय सुरू करण्यात आलं. तेव्हापासून सप्टेंबर महिन्यांपर्यंत ससूनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतच गेल्याचं पाहायला मिळालं. जवळपास 450 हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू होते. त्याचसोबत सारी आणि इतर श्वसनाचे आजार असलेल्या रुग्णांवरही कोविड केंद्रात उपचार सुरू होते. त्यामुळं एकूण रुग्णांचा आकडा हा 500 च्या पुढं गेला होता. परिणामी रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि संपूर्ण यंत्रणेवरच मोठा ताण पडला होता. तज्ज्ञ डॉक्टर आणि नर्स मिळवणं कठिण जात होतं.

20 मेला रुग्णालयात रुग्णांचा आकडा शंभराच्या पुढे गेला. त्यानंतर 3 महिन्यांत 400 च्या पुढं रुग्ण झाले. पुढील महिनाभर 400 ते 450 दरम्यान कोरोनाबाधित रुग्ण ससूनमध्ये उपचार घेत होते. त्यानंतर 24 सप्टेंबरला पहिल्यांदाच रुग्णसंख्या 400 च्या खाली आली. तर पुढील 15 दिवसात हा आकडा शंभरच्या खाली आल्याचं दिसून आलं. बाधित रुग्णांची संख्या कमी झाल्यानं ससूनप्रमाणे अन्य रुग्णालयांवरही ताण कमी होत आहे. परंतु ससून रुग्णालयात आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण उपचार घेत होते.

ससून कोविड केंद्रातील मंगळवारची स्थिती
कोरोनाबाधित रुग्ण – 84
सारी आणि अन्य आजार – 22
व्हेंटीलेटरवरील – 44
इतर आजार असलेले – 19
एकूण घरी सोडलेले – 2588
एकूण बाधित दाखल – 4358
एकूण संशयित दाखल – 19229

बाधित रुग्णांचे टप्पे

रुग्णांमध्ये वाढ
20 मे – 108
12 जुलै – 210
3 ऑगस्ट – 304
24 ऑगस्ट – 417

रुग्णसंख्या कमी
24 सप्टेंबर – 393
1 ऑक्टोबर – 234
3 ऑक्टोबर – 187
11 ऑक्टोबर – 94