Coronavirus World Updates : जगातील ‘कोरोना’बाधितांची संख्या 7 लाखाच्या पार, आतापर्यंत 33000 जणांचा मृत्यू

पॅरीस : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले असून या विषाणूमुळे जगभरात 7 लाखांपेक्षा अधिक लोकांना याचा संसर्ग झाला आहे. तर या विषाणूमुळे जगभरात आतापर्यंत 33 हजारांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अधिकृत सुत्रांनी सोमवारी हा आकडा तयार केला आहे. या आकडेवारीनुसार 183 देश आणि प्रदेशात कोरोना विषाणूच्या संसर्गाने कमीत कमी 7 लाख 15 हजार 204 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 33 हजार 568 जणांचा मृत्यू झाला आहे.

इटलीमध्ये सर्वाधिक मृत्यू
एएफपीने तयार केलेल्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत कोरोना या रोगाची 1 लाख 43 हजार 025 जणांना लागण झाली आहे. तर 2 हजार 214 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे इटलीमध्ये 97 हजार 689 जणांना संसर्ग झाला असून यामध्ये 10 हजार 779 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जगभरात सर्वाधिक मृतांची संख्या इटलीमध्ये आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान ज्युसेप्पे कॉन्टे यांच्या सरकारने इटलीतील जनतेला दिर्घकालीन लॉकडाऊनसाठी तयार राहण्यास सांगितले आहे. इटली सरकारने म्हटले आहे, इटलीतील जनतेला आर्थिक अडचणी व नियमित दिनक्रमांसाठी त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे बंद हळू-हळू हटविला जाईल.

स्पेनमध्ये गेल्या 24 तासांत 812 जणांचा मृत्यू
स्पेनमध्ये गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 812 जणांचा मृत्यू झाल्याची खात्री झाली आहे. त्यामुळे स्पेनमध्ये मृतांचा आकडा 7 हजार 340 वर पोहचला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, स्पेनमध्ये पहिल्यांदाच गुरुवारपासून 24 तसांच्या कालावधीत मृतांच्या संख्येत घट झाली आहे. इटलीनंतर कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव स्पेनमध्ये झाला आहे. स्पेनमध्ये रविवारी 838 लोकांचा मृत्यू झाला आहे.

इराणमध्ये मृतांची संख्या 2,757
इराणमध्ये देखील कोरोना व्हायरसने शिरकाव केला आहे. सोमवारी आणखी 117 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर इराणमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2 हजार 757 वर पोहचली आहे. आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते किन्योस जहांपूर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, रविवारी या कोरोना विषाणूमुळे संक्रमीत झालेल्या लोकांची संख्या 41 हजार 495 वर पोहचली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग आणि प्रसार रोखण्यासाठी सोमवारी रशियाची राजधानी मॉस्को येथे बंद लागू करण्यात आला आहे. तर रशियाचे पंतप्रधान मिखाईल मिशुस्तीन यांनी प्रादेशिक अधिकाऱ्यांना अशीच व्यवस्था करण्यास सांगितले आहे.

न्यूयॉर्कमध्ये मृतांचा आकडा हजारावर
न्यूयॉर्क राज्यात कोरोना विषाणूमुळे मृत झालेल्यांचा आकडा एक हजाराच्या पुढे गेला आहे. कोरोनाचा केंद्रबिंदू बनलेल्या अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये कोरोनाचा उद्रेक होण्यापूर्वी हजारो लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती न्यूयॉर्कच्या राज्यपालांनी दिली आहे.

जस्टिन टूडो यांच्या पत्नीची कोरोनावर मात
कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन टूडो यांच्या पत्नीला कोरोना विषाणूची लागण झाली होती. मात्र, योग्य उपचाराने त्यांनी कोरोना विषाणूवर मात केली असल्याची माहिती रविवारी टूडो यांनी दिली. ती बरी झाली असली तरी तिने स्वत: ला क्वारंटाईन करून घेतले आहे

पाकिस्तानात 18 लोकांचा मृत्यू
पाकिस्तानमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. पाकिस्तानमध्ये 1 हजार 625 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 18 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली. तसेच त्यांनी कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने भीती व्यक्त केली आहे.

सिंगापूरमध्ये नवे 42 रुग्ण
रविवारी सिंगापूरमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या नवीन 42 जणांची नोंद झाली आहे. यामध्ये तीन भारतीयांचा समावेश आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशात आता संक्रमित होण्याचे प्रमाण वाढत असून आतापर्यंत देशात 844 जणांना विषाणूची लागण झाली आहे.