Coronavirus : ‘लठ्ठ’ लोकांसाठी ‘कोरोना’ जास्तच धोकादायक, ‘आयसोलेशन’साठी पुरेसे नाहीत 14 दिवस

नवी दिल्ली – कोरोना विषाणूपासून वाचण्यासाठी 14 दिवस विलगीकरणाचा सल्ला डॉक्टर देत आहेत. स्थूल व्यक्तींना 14 ऐवजी 28 दिवस विलगीकरणात ठेवण्याचा सल्ला इटलीतील संशोधकांनी दिला आहे. एन्फ्लुएंझाच्या आधारावर झालेल्या एका संशोधनाला अनुसरून त्यांनी हा सल्ला दिला आहे. स्थूल व्यक्ती कोविड-19 सारख्या संसर्गजन्य आजाराबाबत जास्त संवेदनशील असतात त्यामुळे त्यांना आजाराचा 14 हून जास्त दिवस त्रास होऊ शकतो.

नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थच्या नेचर पब्लिक हेल्थ इमर्जन्सी कलेक्शनमध्ये हे संशोधन प्रकाशित झालं आहे. जाड व्यक्तींमध्ये रोगप्रतिकार शक्ती कमी असते त्यामुळे एन्फ्लुएन्झाचा त्यांना जास्त दिवस त्रास होतो तसंच कोरोनाच्या विषाणूबाबतही होऊ शकतं असं या शास्रज्ञांनी म्हटलं आहे. त्यामुळे एखाद्या स्थूल व्यक्तीला कोविड-19 ची लागण झाली असेल तर त्याला 28 दिवस विलगीकरणात राहण्याची गरज आहे, असेही शास्रज्ञांनी स्पष्ट केले आहे.