Coronavirus Lockdown : ‘कोरोना’मुळं राजस्थानमधून ‘या’ राज्यात पायी जात आहेत मजूर

राजस्थान : वृत्तसंस्था – भारतात कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी पुढचे २१ दिवस लॉकडाऊन केले गेले असून लोकांना २१ दिवस आपल्या घरी राहण्यास सांगितले गेले आहे. या निर्णयानंतर पब्लिक ट्रान्सपोर्ट पूर्णपणे बंद केले असून बस, ट्रेन, विमान, रिक्षा टॅक्सी या सर्वांवर बंदी आहे. अशात राजस्थानच्या एका कोल्ड स्टोअरमध्ये करणाऱ्या १४ मजुरांनी आपल्या घरी बिहारला जाण्यासाठी जे केले ते आश्चर्यकारक आहे.

कोल्ड स्टोअर बंद झाल्यावर १४ मजूर राजस्थानमधून बिहारला येण्यासाठी पायी निघाले आणि तीन दिवस सतत चालल्यानंतर ते फक्त आग्रापर्यंत पोहोचू शकले. यादरम्यान रस्त्यावर भुकेमुळे त्यांची प्रकृती खराब झाली.

तीन दिवस प्रवास केल्यानंतरही ते आपल्या घरी जाण्यासाठी आता जवळजवळ १००० किलोमीटरचे अंतर त्यांना पार करायचे आहे. या मजुरांनी सांगितले की, ते सगळे जयपूरच्या एका कोल्ड स्टोरेजमध्ये काम करत होते. त्यांना काम सुरु करून २५ दिवस झाले होते कि पूर्ण जयपूरमध्ये लॉकडाऊन केले गेले. लॉकडाऊन झाल्यानंतर कोल्ड स्टोरेजच्या मालकाने त्यांना २००० रु. दिले आणि घरी जाण्यास सांगितले, कारण कोल्ड स्टोरेज बंद केले गेले आहे.

ट्रेन, बस किंवा इतर कोणतेही साधन न मिळाल्याने त्यांनी पायी घरी जाण्याचे ठरवले आणि जयपूरहुन ते निघाले. तीन दिवसात ते आग्राला पोहोचले. दरम्यान त्यांना रस्त्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यांनी सांगितले की, जेव्हा ते जयपूरहून पायी निघाले तेव्हा कर्फ्यूमुळे काही ठिकाणी पोलिसांनी थांबवले. पण कोणतेही वाहन नसल्याने त्यांना जाऊ दिले.