‘कोरोना’ लेदर बॉलसारखी कडक फुफ्फुस बनवितं , भारतात पहिल्यांदाच आलं असं भीतीदायक प्रकरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणू मानवाच्या श्वसन यंत्रणेत प्रवेश करतो आणि त्याचे फुफ्फुस नष्ट करतो आणि त्याला मृत्यूच्या उंबरठ्यावर नेतो. कोविड -19 हा आपल्या फुफ्फुसांचे काय हाल करतो याचे एक भयावह उदाहरण कर्नाटकात पाहायला मिळाले आहे. येथे 62 वर्षांच्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यांचे फुफ्फुसे एका ‘लेदर बॉल’ सारखे कडक बनले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, फुफ्फुसांची अशी वाईट अवस्था झाल्यानंतर रुग्णाचा मृत्यू झाला. आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की, रुग्णाच्या मृत्यूच्या 18 तासांनंतर, त्याच्या नाक आणि घशात व्हायरस सक्रिय होता. म्हणजेच, संक्रमित व्यक्तीच्या मृत्यूनंतरही, त्या मृत शरीराच्या संपर्कात आल्यामुळे इतर लोक आजारी पडू शकतात.

ऑक्सफोर्ड मेडिकल कॉलेजचे डॉक्टर दिनेश राव म्हणाले की, कोरोनामुळे या रुग्णाची फुफ्फुसे लेदरच्या बॉलसारखी कडक झाली होती. फुफ्फुसातील हवा खराब झाली होती आणि पेशींमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्या होत्या. मृतदेहाच्या तपासणीमुळे कोविड – 19 ची प्रोग्रेशन समजून घेण्यात मदत झाली आहे.

अहवालानुसार, डॉ. राव यांनी शरीर, नाक, घसा, फुफ्फुसातील पृष्ठभाग, श्वसन मार्ग आणि चेहऱ्याच्या आणि घशातील त्वचेवरुन पाच प्रकारचे स्वॅप नमुने घेतले होते. आरटीपीसीआर चाचणीत असे दिसून आले की, घशातील आणि नाकाचा नमुना कोरोना विषाणूसाठी सकारात्मक होता. याचा अर्थ असा आहे की, कोरोना रूग्णाचे शरीर इतर लोकांना संक्रमित करु शकते. तथापि, त्वचेतून घेतलेल्या नमुन्यांचा अहवाल नकारात्मक होता.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या या रुग्णाच्या शरीराची तपासणी कुटूंबाच्या संमतीने केली गेली. जेव्हा रुग्ण मरण पावला तेव्हा त्याचे कुटुंब घरीच क्वारंटाइन झाले. त्यांना मृतदेहासाठी दावादेखील करता आला नाही.

डॉ. राव म्हणाले की, शरीर तपासणीनंतर तयार केलेला माझा अहवाल अमेरिका आणि ब्रिटनमधील अहवालांपेक्षा अगदी वेगळा आहे. याचा अर्थ असा होऊ शकतो की, भारतात दिसणारी विषाणूची जाती इतर देशांपेक्षा वेगळी आहे.