Coronavirus : हॉस्पीटलमधून पळून गेला ‘कोरोना’ व्हायरसचा रूग्ण, ‘गल्ली-बोळा’त पोलिसांकडून शोध सुरू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसने आतापर्यंत जगभरात 3 हजार पेक्षा जास्त लोकांचा जीव घेतला. भारतात देखील आतापर्यंत 30 कोरोनाग्रस्त सापडले आहेत. ज्यांना डॉक्टर्सच्या देखरेखीत ठेवण्यात आले आहे. या दरम्यान ओडिसामधून एक बातमी समोर आली आहे. त्यामुळे एका सरकारी रुग्णालयाचे धाबे दणाणले आहेत.

ओडिसाच्या कटकमध्ये एक कोरोना संशयित रुग्ण उपचारादरम्यान रुग्णालयातून पळाला. हे प्रकरण गुरुवारचे आहे. सांगण्यात येत आहे की एक आयरिश नागरिक भुवनेश्वरच्या बीजी पटनायक आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर आला होता.

विमानतळावर कोरोना व्हायरसच्या सुरु असलेल्या तपासणी दरम्यान आयरिश नागरिकाचे बॉडी टेम्परेचर वाढलेले दिसले. यानंतर त्याला कटकच्या एससीबी मेडिकल कॉलेज अ‍ॅण्ड हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले होते.

हॉस्पिटलमध्ये त्याला कोरोना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले होते. या दरम्यान हॉस्पिटलमध्ये अन्य रुग्णांची देखील देखभाल सुरु आहे. जेव्हा डॉक्टरांनी आयरिश नागरिकाला तपासणीसाठी आणण्यास सांगितले तेव्हा तो खोलीत नव्हता. एका रुग्णाने सांगितले की आयरिश नागरिक रुग्णालयातून पळाला.

आयरिश नागरिक रुग्णालयातून पळाल्याची माहिती मिळाल्यानंतर शहरात खळबळ उडाली. प्रशासन देखील खडबडून जागे झाले. रुग्णालय प्रशासन आणि पोलीस या आयरिश नागरिकाचा शोध घेत आहेत. परंतु तो अद्याप सापडलेला नाही.

यानंतर गुरुवारी रात्री आयरिश नागरिकाच्या विरोधात मंगलाबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलीस सध्या आयरिश नागरिकाचा शोध घेत आहेत आणि त्याच्या साथीदाराची चौकशी केली जात आहे.