Pune : ‘रेमडीसिवीर’चा काळाबाजार करणाऱ्यांचा पर्दाफाश; चौघांना अटक तर पावणे 2 लाखाचा माल जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना पुणे त्यामध्ये आघाडीवर आहे. त्यामध्येच एकीकडे कोरोना रुग्णांना रेमडीसिवीर इंजेक्शन अपुरे पडत असून तर दुसरीकडे रेमडीसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार होताना दिसत आहे. आज रेमडीसिवीर इंजेक्शनाचे जादा दराने विक्री करणाऱ्या ४ आरोपीना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सापळा रचून त्याना ताब्यात घेतले आहे. चौघा आरोपीकडून १५ हजार प्रमाणे ३ रेमडेसीवीर, रोकड, असा तब्बल १ लाख ७४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे.

रेमडीसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणारे आदित्य दिगंबर मैदर्गी (वय २४, रा. पिंपरी), प्रताप सुनील जाधवर (वय २४, रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ), अजय गुरुदेव मोराळे (वय २५, रा. सांगवी), मुरलीधर मारुटकर (वय २४, रा. बाणेर), अशी त्यांची नावे आहेत. ही कारवाई शुक्रवारी (दि. ९) पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभाग आणि अन्न सुरक्षा विभाग यांच्या पथकाने सांगवी येथे केली आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, बनावट ग्राहकाद्वारे आरोपी आदित्य मैदर्गी याला कॉल केला असता एका रेमडीसिवीर इंजेक्शनसाठी ११ हजार यानुसार २ इंजेक्शनसाठी २२ हजार रूपये द्यावे लागतील, असे म्हटले. त्यानंतर मैदर्गी याने इंजेक्शन विक्रीसाठी काटे पुरम चौकात आल्यावर त्याला ताब्यात घेतले.त्याच्याकडे २ होते. तर प्रताप जाधवर याने रेमडीसिवीर दिल्याचे त्याने सांगितले असता, मैदर्गीला पोलिसानी तेथून जाधवर याला फोन करण्यास सांगितले. त्यावेळी एकच इंजेक्शन शिल्लक असल्याचे जाधवरने म्हटले. ते इंजेक्शन विक्रीसाठी घेऊन जाधवर काटेपुरम चौकात आला असता तेव्हा त्याला तिथे ताब्यात घेण्यात आले. तसेच, त्याने आरोपी अजय मोराळे याच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले. त्यानुसार अजय मोराळे याला औंध येथील मेडीपॉईंट हॉस्पिटल येथे रंगेहात पकडले. त्याच्याकडे तीनही इंजेक्शन बाणेर कोविड सेंटर येथे ब्रदर म्हणून नोकरीस असलेल्या आरोपी मुरलीधर मारुटकर याच्याकडून घेतल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार बाणेर येथून आरोपी मारुटकरलाही उचलण्यात आले.

दरम्यान, आरोपी मुरलीधर मारुटकर हा बाणेर येथील कोवीड सेंटरमध्ये ब्रदर म्हणून कामाला आहे. त्याने इतर आरोपींशी संगनमत करून कोविड सेंटरमधून रेमडीसिवीर इंजेक्शन अवैध मार्गाने मिळवून ते इतर आरोपींना दिले. तसेच त्या इंजेक्शनची छापील किमतीपेक्षा अधिक दराने अकरा ते पंधरा हजारांना विक्री करताना ही माहिती मिळाली. तसेच, या आरोपींकडून ८० हजारांची टुव्हीलर, ६९ हजारांचे ४ मोबाइल, १५ हजार रुपये किमतीचे ३ रेमडेसीवीर इंजेक्शन, १० हजार ४०० रुपये रोख, असा १ लाख ७४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसाकडून जप्त करण्यात आला आहे.