आज देशाला संकल्प आणि संयमाची गरज आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अद्याप कोरोनावर कोणतीही लस शोधण्यात आलेली नाही. तसंच काही उपायही शोधण्यात आलेला नाही. त्यामुळे देशवासियांची चिंता वाढणं स्वाभाविक आहे. जगातल्या ज्या देशांमध्ये कोरोना व्हायरस आणि त्याचा प्रभाव जास्त आहे तिथे अचानक कोरोनाचं संकट गंभीर झालं आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या त्या देशांमध्ये वेगाने वाढली आहे. भारत सरकार या स्थितीवर नजर ठेवून आहे. भारताची लोकसंख्या 130 कोटीच्या घरात आहे. भारतासारख्या 130 कोटींच्या विकसनशील देशावर कोरोनाचं संकट सामान्य गोष्ट नाही. प्रत्येकाने संयम ठेवला पाहिजे आणि संकल्प केला पाहिजे की केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्देशांचं पालन करू, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून बोलताना म्हटले आहे.

कोरोना नावाच्या संकटाने जगाला ग्रासले आहे. जगातल्या सगळ्या मानवजातीला कोरोनाचा त्रास होत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या वेळीही जगातल्या सगळ्या देशांवर इतका गंभीर परिणाम झाला नव्हता तेवढा कोरोनामुळे होत आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मागच्या दोन महिन्यापासून आपण कोरोनाबाबत विविध बातम्या ऐकतो आहोत आणि पहात देखील आहोत. भारतीयांनी कोरोनाचा प्रभावीपणे सामना केला याचं मला कौतुक आहे.

गेल्या काही दिवसांपासून असं वातावरण तयार झालं की आपण संकटापासून वाचलो आहोत. सगळं काही ठीक आहे मात्र जागतिक महामारी असलेल्या कोरोनामुळे निश्चिंत होण्याची ही वेळ नाही. प्रत्येक भारतीयाने सजग राहणं आवश्यक असल्याचे मोदी यांनी म्हटलं आहे. 22 मार्चपासून जनता कर्फ्यू लागणार आहे. स्वत:च स्वत:वर बंधनं लादायची आहे. पुढे येणाऱ्या आव्हानांसाठी हे गरजेचे आहे. येत्या रविवारी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत जनता कर्फ्यू असणार आहे. कोणताही नागरिक यावेळेत बाहेर पडणार नाही. सोसायटीच्या बाहेर पडणार नाही. तसेच रस्त्यावर फिरणार नाही, असे मोदींनी सांगितले.