PSI भावांचा दुर्दैवी मृत्यू ! हृदयविकाराने आधी नितीन आणि आता ‘कोरोना’मुळे सचिन गेला !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईत कोरोनानं थैमान घातलं आहे. मुंबईत कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. रुग्णाची संख्या वाढत असताना मृतांची आकडेवारी सतत वाढत आहे. त्यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील विक्रोळी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक सचिन दिनकर पाटील (वय-41) यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे.

सचिन पाटील हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील उदगावचे रहिवासी होते. सचिन पाटील यांच्या निधनामुळे शिरोळ तालुक्यावर शोककळा पसरली आहे. धक्कादायक म्हणजे सचिन पाटील आणि नितीन पाटील हे दोघे उपनिरीक्षक म्हणून पोलीस दलात भरती झाले होते. नाशिक इथे प्रशिक्षण सुरु असताना नितीन पाटील यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. आता सचिन पाटील यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. सचिन पाटील हे मुंबईतील विक्रोळी स्टेशनमध्ये पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत होते.

सचिन पाटील यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यानंतर गेल्या चार दिवसांपासून ताप होता. त्यांना ठाणे येथील गुरुनानक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सेवन हिल्स रुग्णालयात त्यांच्या प्लाझ्मा थेरपी करण्यात येणार होती. त्यामुळे त्यांनी गुरुवारी सेवन हिल्स रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र, प्लाझ्मा थेरपी करण्याआधीच सचिन पाटील यांची प्राणज्योत मालवली. दोन्ही PSI भावांच्या दुर्दैवी मृत्यूने पाटील कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like