हॅलो…हॅलो… ! ‘कोरोना’ कधी संपणार ? पुणेकरांच्या प्रश्नाच्या भडीमारानं ‘कंट्रोल’ रूममधील पोलिसांची ‘तारांबळ’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक पेठा सील करण्यात आल्या आहे. कोरोनामुळे पुणेकर नागरिक हैराण झाले आहेत. यामुळे पुणेकर नागरिक पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून कोरोना कधी संपणार अशी विचारणा करू लागले आहेत. पोलीस नियंत्रण कक्षाला दररोज अनेक फोन येत असतात. फोन करणाऱ्या व्यक्तीच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी अधिकारी नियंत्रण कक्षात कर्तव्य बजावत असतात. मात्र, पुणेकरांच्या कोरोना कधी संपणार या प्रश्नाला उत्तर देताना त्यांची चांगलीच तारांबळ उडत आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले होते. लॉकडाऊन काळात शहरातील नागरिकांच्या मदतीसाठी पुणे पोलिसांनी अहोरात्र काम केले. विशेषत: नियंत्रण कक्षात आलेल्या फोन वरून बहुतांश पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अनेक वृद्ध नागरिक, ज्येष्ठ नागरिकांसह असाह्यांना आधार आणि विद्यार्थ्यांना मदत करण्याचे काम करत माणुसकीचे दर्शन घडवले. पुणेकरांनी नियंत्रण कक्षाला फोन केल्यानंतर त्यांच्या शंकांचे निरसन आणि त्यांना मदत करून त्यांची अडचणीतून सोडवणूक केली. मात्र, काही फोन कॉल करणाऱ्यांना उत्तर देताना पोलिसांची चांगली तारांबळ उडाली. कारण समोरून फोन करणारा व्यक्ती कोरोना कधी संपणार अशी विचारणा करत असल्याचे समोर आले आहे.

नागरिकांकडून पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून कोरोना कधी संपणार हा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. मात्र, या प्रश्नामुळे अचूक उत्तर देणे अवघड आहे. पण जेव्हा आपण सर्व नियमांचे पालन करायला सुरुवात करू तेव्हाच कोरोनाचा अंत होणार आहे. अशा प्रकारे पुणेकरांच्या प्रश्नाचे उत्तर देऊन समाधान केले जात असल्याचे पुणे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी सांगितले.