Coronavirus : गळा झाला खराब, ‘कोरोना’ झाल्याचा संशय, वृध्द महिलेनं केली ‘आत्महत्या’

पंजाब : वृत्तसंस्था – जगभरात जवळजवळ ७५ हजार लोकांचा मृत्यू कोरोना व्हायरसमुळे झाला असून या व्हायरसची दहशत वाढत आहे. कोरोना झाल्याचा संशय आल्याने काहींनी तर आत्महत्या देखील केली असल्याच्या घटना घडल्या आहेत. याचे ताजे प्रकरण पंजाब मधील कपूरथला येथील आहे. इथे एका ६५ वर्षीय महिलेने कोरोनाच्या भीतीने आत्महत्या केली आहे.

मृत महिलेचे नाव संतोष कौर असून त्या खुर्मपुर गावात राहणाऱ्या होत्या. वेळीच पोलीस घटनास्थळी पोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमसाठी पाठवून दिला. संतोष कौर यांना चार मुली असून त्यांचे लग्न झाले आहे आणि पती गेल्या वर्षी मरण पावले. यामुळे संतोष कौर या त्यांच्या घरात एकट्याच राहत असत. काही दिवसांपासून त्यांचा घास खराब असल्याने त्यासाठी औषधंही चालू होती.

घसा दुखत असल्याने त्यांना असे वाटले कि त्यांना कोरोना व्हायरसचे संक्रमण झाले आहे. या कारणामुळे त्या आसपाच्या लोकांपासून देखील दूर राहत होत्या. त्यांच्या मोठ्या मुलीने सांगितले की, तिचे आपल्या आईसोबत रात्री दोन वाजता बोलणे झाले होते. यानंतर फोन उचलला नाही.

शेजाऱ्याने फोन केला असता संतोष कौर यांचे निधन झाल्याचे समजले. दुसरीकडे सिव्हिल हॉस्पिटलचे एसएमओ कमल किशोर यांनी सांगितले की, मृताला कोरोना व्हायरसचे संक्रमण अजिबात नव्हते. त्यांचा मृत्यू विषारी पदार्थ खाल्ल्यामुळे झाला, त्यांचे पोस्टमार्टम करून मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला.

आतापर्यंत पंजाबमध्ये कोरोनाची जवळपास ८० प्रकरणे नोंदवली गेली आहेत, ज्यात ७ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ४ जण बरे झाले आहेत. त्याचबरोबर, देशभरातील रुग्णांची संख्या ४२८१ आहे, ज्यात १११ लोकांचा बळी गेला आहे. ३०० हून अधिक लोक बरे झाले आहेत ही विशेष बाब आहे.