पोलिसनामा ऑनलाईन टीम – देशभरातील नागरिकांमध्ये कोरोनाची धास्ती असून एका वृद्धाचा मृतदेह गावाच्या वेशीवरच अडवून अंत्यविधीला विरोध करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गावकर्यांनी संंबंधित कुटुंबीयांवर गावकर्यांनी बहिष्कार घातला आहे. गावकर्यांनी कडाडून विरोध केल्यामुळे अखेर पीडित कुटुंबीयांना वृद्धाच्या पार्थिवावर गावाबाहेरील शेतात अंत्यसंस्कार करावे लागले. सांगोला तालुक्यात ही घटना घडली आहे.
आजारपणामुळे पुण्यात ससून रूग्णालयात एका वृद्धाचे निधन झाले होते. श्वसनविकार व न्यूमोनियामुळे वृद्धाचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यानंतर मुलगा कांबळेने एका महिला नातेवाईकासह भाडोत्री वाहनातून वडिलांचा मृतदेह शिरभावी गावात आणला. कोरोना फैलावाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी, संचारबंदी तथा जिल्हाबंदी असतानाही मृतदेह पुण्याहून कसा आणला, याबद्दल गावकर्यांनी आक्षेप घेतला. गावातील सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यविधीला विरोध केला.
कोरोनाच्या भीतीमुळे मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांवर गावकर्यांनी बहिष्कार घातला. त्यामुळे नातेवाईक महिलेच्या मदतीने शेतातच अंत्यसंस्कार करावे लागले. अंत्यसंस्कार उरकल्यानंतरही गावकर्यांनी मृताच्या मुलाला आणि त्याच्या नातेवाईक महिलेला गावात येण्यास विरोध केला. दरम्यान, ही बाब समजल्यानंतर गावात पोलिस धावून आले. गावकर्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्याचा उपयोग झाला नाही. अखेर मृताच्या मुलासह संबंधित नातेवाईक महिलेची सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत.