आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर ! ‘कोरोना’ वॉरियर्सच्या जेवणात निघाले झुरळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोना रुग्णाच्या सेवेत अनेक कोरोना वॉरियर्स रात्रंदिवस काम करत आहेत. कोरोना रुग्णांच्या सेवेत असणाऱ्या या कोरोना वॉरियर्सच्या जेवणामध्ये झुरळ आढळल्याने एकाच खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वी दुपारच्या जेवणात झुरळ तर शुक्रवारी सकाळी नाश्त्याच्या वेळी आळी निघाल्याने कोरोना वॉरियर्स मध्ये नाराजी आहे. यापूर्वी ज्या कंपनीला जेवणाचे कंत्राट देण्यात आले होते त्यांच्या जेवणात देखील असाच प्रकार घडला होता. आता नवीन कंत्राट असणाऱ्या खासगी कंपनीकडून अशाच पद्धतीने निकृष्ट जेवण दिले जात असल्याने कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या घटनेनंतर कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना या प्रकरणाची चौकशी करण्याबाबत निवेदन दिले आहे. ससून रुग्णालयात तसेच रुग्णालयाच्या नवीन इमारतीमध्ये मोठ्या संख्येने सफाई कर्मचारी कार्यरत आहेत. एका शिप्टमध्ये साधारण 150 ते 200 कर्मचारी काम करत असतात. त्यांना कोरोनाची ड्युटी असल्याने त्यांची जेवणाची व्यवस्था रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आली आहे. मात्र, या कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे जेवण योग्य नसल्याचे समोर आले आहे.

कर्मचाऱ्यांनी निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याने कर्मचाऱ्यांनी याबाबत प्रशासनाकडे तक्रार करून जेवण देणारा कंत्राटदार बदलावा अशी मागणी केली. यानंतर कंत्राटदार बदलण्यात आले. यानंतर नव्याने कंत्राट देण्यात आलेल्या एका कंपनीकडून निकृष्ट दर्जाचे जेवण मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे याविरोधात तक्रार केल्यानंतर देखील संबंधित अधिकाऱ्यांकडून याची दखल घेतली गेली नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

बुधवारी दुपारी जेवण आणण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना जेवणाच्या बॉक्समध्ये झुरळ आढळले. तर शुक्रवारी सकाळी नाश्त्यामध्ये देण्यात आलेल्या सँडविचमध्ये आळी आढळून आली. ही बाब संबंधित कंत्राटदाराच्या लक्षात आणून दिली. आता यावर प्रशासनाकडून काय निर्णय घेतला जातो याच्या प्रतिक्षेत कर्मचारी आहेत. दरम्यान, रुग्णालयात कोरोनाचे रुग्ण येण्यास सुरुवात झाल्यापासून वर्ग 4 मधील कर्मचाऱ्यांची नियुक्ती कोविड-19 मध्ये काम करण्यासाठी झाली. मात्र अधकाऱ्यांच्या मर्जीतील कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या असून जे कर्मचारी प्रामाणिकपणे काम करत आहेत त्यांना पुन्हा ड्युटी करावी लागत आहे. अशी तक्रार कर्मचारी संघटनेने केली आहे.

कामबंद आंदोलनाचा इशारा

आरोग्य प्रशासन कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळत आहे. कामाचे वाढलेले तास, त्याचा मोबदला न देणे असे प्रकार सुरु आहेत. यावर कुणी आवाज उठवला तर त्याच्यावर कारवाई होते. मात्र, जे दोषी आहेत त्यांना कुणीच शासन करणार आहे का ? दिवसरात्र आम्ही सफाई कामगार याठिकाणी रुग्णांच्या सेवेसाठी काम करत आहेत. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर कोणी बोलण्यास तयार नाही. दिलेल्या निवेदनाकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. आताच्या प्रकरणावरून ससून प्रशासनाने कठोर अंमलबजावणी न केल्यास कर्मचारी कामबंद आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत, असे अंत्योदय कामगार परिषद ट्रेड युनियन, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय मोमजादे यांनी सांगितले.