Coronavirus : धक्कादायक ! ‘या’ शहरातून तब्बल 167 संशयित बेपत्ता, प्रशासनात माजली खळबळ

लुधियाना : वृत्तसंस्था – संपूर्ण जगभरामध्ये कोरोना व्हायरसमुळे दहशत पसरली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. भारतामध्ये कोरोना व्हायरसचे 147 रुग्ण आढळून आले आहेत. तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक 42 रुग्ण सापडले आहेत. कोरोनाची लक्षण आढळल्यास अशा रुग्णांना तातडीने विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे. योग्य उपचाराने कोरोनाचे रुग्ण बरे देखील झाले आहेत.

पंजाबमधील लुधियानामध्ये कोरोनाचे 167 संशयित रुग्ण बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोरोना संशयित मोठ्या संख्येने बेपत्ता झाल्यामुळे प्रशासन देखील खडबडून जागे झाले आहे. कोरोना संशयित रुग्णांचा शोध सुरु करण्यात आला आहे. बेपत्ता झालेल्या संशयित रुग्णांपैकी 29 जणांची माहिती मिळाली असून अन्य 167 लोकांचा अद्याप शोध लागलेला नाही. प्रशासनाकडून या रुग्णांचा शोध युद्ध पातळीवर सुरु आहे.

संशयित रुग्णाचा शोध घेण्याची जबाबदारी पोलिसांवर
पंजाबमधील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना नुकतेच परदेश दौरा करून परतलेल्या नागरिकांची यादी देण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून या नागरिकांचा शोध घेतला जात आहे. जेणेकरून कोरोना संसर्ग झाल्यास त्यांना विलगीकरण कक्षात ठेवता येईल. शहरातील सिव्हिल सर्जन राजेश कुमार बग्गा यांनी सांगितले की, परदेशातून येणाऱ्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी दोन पथके तयार करण्यात आली आहेत. 119 नागरिकांचा शोध घेण्याची जबाबदारी पोलिसांवर सोपवण्यात आली आहे. त्यांना आत्तापर्यंत 12 नागरिक सापडले आहेत. आरोग्य विभागाच्या दुसऱ्या पथकाला सुमारे 77 जणांचा शोध घेण्यास सांगण्यात आले आहे.

पासपोर्टवर चुकीचे पत्ते आणि फोन नंबर
आरोग्य विभागाच्या पथकाला 17 संशयित आढळले आहेत. उर्वरीत 167 जण लुधियानामध्ये बेपत्ता आहेत. बेपत्ता असलेल्या लोकांचा शोध न लागण्याचे मुख्य कारण पासपोर्ट आहे. पासपोर्टमधील चुकीचा पत्ता किंवा दूरध्वनी क्रमांक चुकीचा असू शकतो. पत्ता आणि फोन नंबर बदलले असल्याचे सिव्हिल सर्जन कुमार यांनी सांगितले.

पंजाब सरकारने बाहेरून आलेल्यांची तपासणी केली नाही
कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता लुधियाना रेल्वे स्थानकाचा आसपासचा परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. यापूर्वी 14 मार्च रोजी पंजाबमधून धक्कादायक माहिती समोर आली होती. आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने जारी केलेल्या वैद्यकीय बुलेटिनमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रवास करणारे 335 लोक बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले होते. पंजाब सरकारने बाहेरून परत आलेल्या लोकांची तपासणी केली नसल्याने आता ते कोठे आहेत याची माहिती मिळत नाही.