होय, पुण्यातील व्हेंटिलेटर होताहेत ‘गायब’, 7 दिवसांमध्ये तब्बल 61 झाले कमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. यातच आता व्हेंटिलेटर गायब होत आहेत, अशी धक्कादायक माहिती आता समोर येत आहे. पुण्यात विभागीय आयुक्त कार्यालयाच्या डॅशबोर्डवर 4 सप्टेंबरपर्यंत 531 व्हेंटिलेटर बेड दिसत होते. गेल्या सात दिवसांत त्यातील 61 व्हेंटिलेटर गायब झाले आहेत. तर, शुक्रवारी (दि. 11) दुपारपर्यंत 470 व्हेंटिलेटर असल्याचे दिसले होते. त्यापैकी एकही व्हेंटिलेटर बेड शिल्लक नव्हता. काही कारणांसाठी व्हेंटिलेटरची संख्या कमी झाल्याने प्रशासनाचे ढिसाळ नियोजन आहे, असे समजत आहे. मात्र, यामुळे रुग्णांचा जीव जाण्याची भीती व्यक्त केली जातेय.

पुण्यात कोरोनामुळे आजारी असलेल्या आणि इतर आजार असलेल्या रुग्णांची स्थिती आता गंभीर होतेय. त्यामुळे अनेकांना ऑक्सिजन द्यावा लागत आहे. त्यातील काही जणांना व्हेंटिलेटरची आवश्यकता भासत आहे.

पुणे शहरात उपलब्ध व्हेंटिलेटरची संख्या आणि रुग्णांचे प्रमाण व्यस्त आहे. अनेकदा व्हेंटिलेटर उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यासाठी जम्बो रुग्णालयाची उभारणी केलीय. तिथे किमान 60 व्हेंटिलेटर उपलब्ध होतील, अशी अपेक्षा होती. पण, प्रत्यक्षात या 60 व्हेंटिलेटरची भर पडण्याऐवजी अगोदचे व्हेंटिलेटर कमी झाले आहे.

पुणे शहरात एकट्या ससून रुग्णालयात 123 व्हेंटिलेटर होते. जम्बो रुग्णालयामध्ये रुग्ण भरती होऊ लागल्यानंतर सुमारे 40 व्हेंटिलेटर तिकडे हलविले आहेत. तर 10 ते 15 व्हेंटिलेटरची दुरूस्ती सुरू आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

जम्बो रुग्णालयात सुरूवातीला 30 व्हेंटिलेटर दाखविले होते. ससून रुग्णालयातून दिलेले 40 व्हेंटिलेटर अद्याप सुरू केलेले नाहीत. त्यातच 30 पैकी 15 व्हेंटिलेटर बंद केल्याचे दिसत आहे. शुक्रवारी दुपारपर्यंत डॅशबोर्डवर जम्बो रुग्णालयात केवळ 15 व्हेंटिलेटर दिसत होते. त्यामुळे दि. 4 सप्टेंबरचा 531 व्हेंटिलेटरचा आकडा शुक्रवारी 470 पर्यंत इतका खाली आलाय. दुपारी एक देखील व्हेंटिलेटर शिल्लक नव्हता. सात दिवसांत 61 व्हेंटिलेटर कमी झाल्याने गंभीर रुग्णांचा आकड्याबाबत पुन्हा संभ्रम निर्माण झालाय.

जम्बो रुग्णालयात व्हेंटिलेटर पडून !
ससून रुग्णालय ऑक्सिजन यंत्रणेच्या दुरूस्तीचे काम केले जाणार आहे, असे सांगून जम्बो रुग्णालयात हलविलेले सुमारे 40 व्हेंटिलेटर धुळखात पडून आहेत, असे स्पष्ट झाले आहे. अगोदरच्या एजन्सीकडून योग्य नियोजन न केल्याने नवीन एजन्सी नेमली आहे. कोणतीही घाई न करता रुग्ण वाढविले जात आहे. पण, ससून रुग्णालयामधील व्हेंटिलेटर तातडीने हलविण्याची घाई प्रशासनाने केली. पुणे शहरात एकही व्हेंटिलेटर उपलब्ध नाही, असे डॅशबोर्डवर दिसत असताना जम्बो रुग्णालयात मात्र व्हेंटिलेटर पडून आहेत.

असा आहे, विभागीय आयुक्त कार्यालय डॅशबोर्ड (शुक्रवारी दुपारी 4 वा.)
ऑक्सिजन बेड आयसीयु व्हेंटिलेटर
11 सप्टेंबर 3333 452 470
6 सप्टेंबर 3377 444 480
4 सप्टेंबर 3371 380 531