Coronavirus Impact : ‘कोरोना’मुळं सिध्दीविनायक मंदिराचे दरवाजे दर्शनासाठी बंद

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – चीनपासून सुरुवात झालेल्या कोरोनाने आता जगभर आपली दहशत पसरवली आहे. भारतातही कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारी उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार भारतात ११६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष बाब म्हणजे इतर राज्यांपेक्षा सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात ३७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्य सरकारने शाळा, कॉलेज, जिम, सिनेमागृह, मॉल्स ३१ तारखेपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुंबईतील प्रसिद्ध प्रभादेवी येथिल सिद्धिविनायक मंदीरामध्ये भाविकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

मंदिराचे दरवाजे बंद करण्याचा निर्णय :
कोरोना बाबत सतर्कता म्हणून मंदिर ट्रस्टच्या वतीने एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी खबरदारी म्हणून सॅनिटायझरचे वाटप करण्यात येणार असून त्याने हात निर्जंतूक केल्यानंतरच मंदिराच्या आवारात प्रवेश देण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र आता आज मंदिराचे दरवाजे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे.

ट्रस्टतर्फे देण्यात येणारी वैद्यकीय मदत सुरु राहणार :
कोरोनाचा संसर्ग होऊ नये, तसेच मंदिराचे भाविकांच्या प्रती असलेले सामाजिक दायित्व लक्षात घेता भाविकांसाठी श्री सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय ट्रस्टच्या व्यवस्थापन समितीने घेतला आहे. परंतु, सदर कालावधीत ट्रस्टतर्फे देण्यात येणारी वैद्यकीय मदत, मदत कक्ष रुग्णांसाठी सुरु राहणार असल्याचे मंदिर प्रशासनाने जाहीर केले आहे.

पुण्यात निर्बंध :
पुणे परिसरात कोरोनो बाधित १६ रुग्ण आढळल्याने प्रशासनाच्या वतीने अनेक निर्बंध लागू केले आहे. नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे, ओपन पार्क बंद करण्यात आले असून फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकाने तेवढी सुरु राहतील, अशी माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर यांनी दिली.