Corona Virus : जीवघेण्या ‘कोरोना’मुळे चीनला झाला ‘हा’ मोठा फायदा, जाणून घ्या

शंघाय : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. उद्योगधंदे, विमान वाहतूक, माल वाहतूक, पर्यटन अशा क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे मोठमोठ्या उद्योगांचे आणि जगातील अनेक श्रीमंतांचे अब्जावधी डॉलसचे नुकसान झाले आहे. असे असताना कोरोनामुळे चीनचा मोठा फायदा झाला आहे.

चीनमध्ये कोरोना या प्राणघातक व्हायरसने 2 हजार 870 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 79 हजार 824 लोकांना संक्रमण झाले आहे. या व्हायरसमुळे चीनचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. मात्र याच दरम्यान एक चांगली बातमी आली आहे. कोरोनाचा फायदा नेहमी प्रदुषणाच्या विळख्यात असलेल्या चीनला झाला आहे. चीनमधील प्रदुषणाची पातळी कमालीची खालवली असून त्याचे फोटो नासाने जारी केले आहेत. चीनमध्ये औद्योगिक परिसरातील अनेक कारखाने आणि या रोगामुळे अनेक लोकांनी घराबाहेर न पडण्याचा निर्णय घेतल्याने वाहनांमधून बाहेर पडणाऱ्या विषारी वायूमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. हे देखील प्रदूषण कमी होण्याचे प्रमुख कारण आहे.

वुहान-शांघायसारख्या औद्योगिक शहरात मोटार वाहने आणि आर्थिक मंदीमुळे नायट्रोजन डायऑक्साईडच्या पातळीत घट झाल्याचे नासाच्या शास्त्रज्ञांनी सांगितले. याचे नासाच्या संशोधकांनाही आश्चर्य वाटले आहे. एका विशिष्ठ कारणास्तव एखाद्या क्षेत्राच्या हवेची गुणवत्ता सुधारली असल्याचे पहिल्यांदाच पाहिले असल्याचे, नासाचे संशोधक फी ली यांनी सांगितले. 2008 मध्ये आलेल्या आर्थिक मंदीच्या काळात नायट्रोजन डाय ऑक्साईडची पातळी खाली आली होती. परंतु त्यावेळी प्रदूषणाच्या पातळीत घट ही आजच्या तुलनेत खूपच कमी होती, असेही त्यांनी सांगितले.

चीनच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, शनिवारी कोरोनाचे लागण झालेल्या लोकांची संख्या 573 होती. त्यापैकी 35 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.