Coronavirus : ‘कोरोना’च्या टेस्टचं लायसन्स मिळवणारी ‘ही’ ठरली देशातील पहिली खासगी संस्था

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला नाकी नऊ आणले आहे. भारतात देखील कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. आतापर्यंत संपूर्ण देशात १५३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून तीन लोकांचा यामुळे मृत्यू देखील झाला आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. केंद्र आणि राज्य सरकार याबाबत मोठी पावलं उचलताना दिसत आहेत. सध्या देशभरात ठराविक सरकारी रुग्णालयांमध्येच कोरोना टेस्ट साठी ब्लड सॅम्पल्स पाठवले जात आहेत. मात्र आता खासगी डायग्नोस्टिक सेंटरलाही या धोकादायक व्हायरसच्या चाचणीची परवानगी देण्याबद्दल उल्लेख करण्यात आलाय. या दरम्यान मुळची स्विस संस्था ‘रोशे डायग्नोस्टिक्स इंडिया’ ही देशातील करोना टेस्ट करणारी पहिली खासगी संस्था ठरली आहे.

 

ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) कडून मंजुरी
‘ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ (DCGI) कडून ही मंजुरी देण्यात आलीय. एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, डीसीजीआय सध्या आणखी एका खासगी डायग्नोस्टिक संस्था ‘बायोम्रिक्स’लाही लायसन्स देण्याचा विचार करत आहे. या संस्थेनं देखील कोरोना व्हायरस संक्रमणाची चाचणी करण्याची परवानगी मागितली आहेत.

चाचणी मोफत केली जावी यासाठीही निर्देश
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, त्रिवित्रोन हेल्थकेअर आणि माय लॅब डिस्कव्हरी सोल्युशन्स या संस्थांनीदेखील विकसित कोरोना व्हायरस संक्रमण चाचणी किटला मंजुरी देण्याची परवानगी डीसीजीआयकडे मागितली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं कोविड १९ ची चाचणी करण्यासाठी उत्सुक असलेल्या खासगी क्षेत्रातील डायग्नोस्टिक केंद्रांसाठी मंगळवारी निर्देश जारी केले होते. ही चाचणी मोफत केली जावी, असेही निर्देश यात करण्यात आले होते.

कुठे आणि कशी होणार टेस्ट
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर २४ तासांपर्यंत हेल्पलाईन सर्व्हिस ०११-२३९७८०४६ या क्रमांकावर फोन करून तुम्ही आपली समस्या सांगू शकता. यासाठी तुम्ही आपल्या राज्यातील हेल्पलाईन क्रमांकावरही संपर्क साधू शकता. या ठिकाणांहून कोविड १९ टेस्टिंग प्रोटोकॉलसाठी संपर्क केला जाईल. त्यानंतर सरकारकडून मान्यता देण्यात आलेल्या लॅबमध्ये कोरोना व्हायरस चाचणी केली जाईल.