पुणे शहरात ऑक्सिजन बेडचा तुटवडा नाही, महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असली तरी शिवाजीनगर येथील जम्बो हॉस्पिटल, बाणेर येथील कोविड हॉस्पिटलसह महापालिकेच्या इतर रुग्णालयात आताच्या परिस्थितीला ३०० हुन अधिक ऑक्सिजन बेड शिल्लक आहेत. शहरात आजमितीला ऑक्सिजन बेडचा तुटवडा नसला तरी व्हेंटिलेटर बेडची संख्या वाढवण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असल्याचे पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.

पत्रकारांशी संवाद साधताना विक्रम कुमार म्हणाले, जम्बो हॉस्पिटल मधील ४०० बेड पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाले आहेत. लवकरच येथे पीएमआरडीएच्या माध्यमातून ४०० बेड सुरु करण्याची कार्यवाही सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी नियोजित डॉक्टर्स आणि नर्सेसच्या नियुक्तीचा प्लॅन तयार केला आहे. ‘मेट्रोब्रो’ कंपनीला येथील व्यवस्थापनाचे काम देण्यात आले असून, त्यांनी ही यादी महापालिकेकडे सुपूर्द केली आहे.

सुरुवातीस जम्बो हॉस्पिटल मधील सुविधांबाबत ओरड होऊन नकारात्मक प्रतिमा तयार झाली होती. पण आता जम्बो हॉस्पिटला बळ देत त्याची पुनःश्च उभारणी करण्यात आली असून, ज्या कंपनीला हे काम देण्यात आले होते, त्यांच्याकडून आता हे काम ‘मेट्रोब्रो’ कंपनीला दिले आहे. कंपनीने काम हाती घेतल्यावर तातडीने ४०० बेडचे काम पूर्णत्वास नेत आणखी ४०० बेडचे नियोजन केले आहे. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ कधी नियुक्त होईल याची सर्व माहिती संबंधित कंपनीने हॉस्पिटल मध्ये नेमलेल्या कार्यकारी समितीकडे दिल्याचे कुमार यांनी म्हटलं.