Coronavirus : महिलांच्या तुलनेत पुरुषांना प्राण गमावण्याचा धोका अधिक, संशोधनातून आले समोर

बोस्टन : पोलीसनामा ऑनलाईन –   कोरोना संसर्गामुळे मृत्यू होणाच्या धोका महिलांपेक्षा पुरुषांना अधिक आहे. समान वय आणि समान आरोग्याच्या स्थितीच्या तुलनेत पुरुषांना हा धोका 30 टक्के अधिक असल्याचे क्लिनिकल इन्फेक्शसस डिजीजेस’ नियतकालिकेत प्रकाशित केलेल्या संशोधन अभ्यासात हा दावा करण्यात आला आहे.

अमेरिकेतील युनिर्व्हसिटी ऑफ मॅरिलँड स्कूल ऑफ मेडिसिनमधील शास्त्रज्ञांनी देशभरातील 613 रुग्णालयात दाखल कोविड-19 च्या जवळपास 67 हजार रुग्णांचा या संशोधनात अभ्यास केला आहे. या अभ्यासानुसार, याआधीच लठ्ठपणा, उच्च रक्तदाब अथवा मधुमेहासारख्या आजाराशी दोन हात करत असलेल्या कोविड-19 ने संसर्गबाधित झालेल्या 20 ते 39 या वयोगटातील रुग्णांना आपल्या वयाच्या इतर बाधितांच्या तुलनेत मृत्यू येण्याचा अधिक धोका आहे.

वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत करोनाबाधितांचे सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत आढळले आहेत. जगभरातील इतर देशांपेक्षा अमेरिकेत सर्वाधिक बाधित आणि कोरोना मृत्यूची नोंद झाली आहे. अमेरिकेत 1 कोटी 60 लाखांहून अधिक करोनाबाधितांची नोंद झाली असून मृतांची संख्या तीन लाखांवर पोहचली. अमेरिकेत कोरोनामुळे मृत होणाऱ्यांमध्ये 65 व त्या वर्षावरील रुग्णांची संख्या मोठी आहे. मृतांमध्ये महिलांपेक्षा पुरुषांची संख्या अधिक आहे. करोनाबाधितांच्या संख्येत पुरुषांपेक्षा महिलांची संख्या किंचत अधिक आहे. मात्र, आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या पुरुषांची संख्या अधिक आहे. आयसीयूमध्ये 61.7 टक्के पुरुषांवर उपचार होतात. तर, 54.1 टक्के पुरुषांचा मृत्यू होत असल्याचे ‘गार्डियन’ने वृत्तात म्हटले आहे.