‘कोरोना’च्या लसीकरणासाठी नोंदणीची प्रक्रिया काय ?, कोण-कोणती कागदपत्रे लागतात ?, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  १६ जानेवारीपासून भारतात कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशभारत कोरोना साथीवर लसीकरण मोहिम सुरू केली. यावेळी त्यांनी देशातील सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील ३००६ सेशन साइट्स लाँच प्रोग्रॅमशी व्हर्च्युअल संवाद साधला. पहिल्या दिवशी भारतात प्रत्येक लसीकरण केंद्रावर जवळपास १०० लोकांना लस टोचली जाईल. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात तीन कोटी लोकांना लस देण्यात येणार आहे. लसीकरण सुरु झाल्यानंतर आता प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे की, त्यांना लस कशी मिळणार? सरकारने यासाठी रजिस्ट्रेशन करण्यास सांगितलं आहे. यासाठी काही कागदपत्रांची गरज आहे.

देशभरात काही रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरु झाले आहे. देशात सध्या भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन आणि सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लसीला मंजुरी मिळाली आहे. याशिवाय इतरही काही लसींची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयात कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला. त्यानंतर एम्सचे संचालक डॉक्टर रणदीप गुलरिया यांनीही लस टोचून घेतली.

लसीकरण करणाऱ्या स्टाफला लस दिल्यानंतर ३० मिनिटानंतर त्यांच्यावर काही दुष्परिणाम होतात का हे पाहिलं जाईल. कोरोना व्हॅक्सिनसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशनची व्यवस्था करण्यात आली आहे. लसीकरणाच्या नोंदणीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, सेवा ओळखपत्र, मनरेगा जॉब कार्ड, पासपोर्ट, स्मार्ट कार्ड, पेन्शन ओळखपत्र, कार्यालय ओळखपत्र, बँक पोस्ट ऑफिस पासबुक आणि आरोग्य विमा स्मार्ट कार्ड यांचा समावेश आहे. यापैकी एक कागदपत्र असेल तर लसीकरणासाठी नोंदणी होऊ शकते. यासोबत एक टोल फ्री हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आला आहे. १०७५ या क्रमांकावर कॉल करूनही याची माहिती मिळेल.

लसीचा डोस घेण्यासाठी नोंदणी करणं गरजेचं आहे. यासाठी सेंटरवर जाऊन तुम्हाला आवश्यक ती कागदपत्रे दाखवावी लागतील. याच आधारावर तुम्हाला कोरोनाची लस देण्यात येईल. लसीकरणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात ज्यांना लस मिळाली आहे त्यांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. याच्या आधारेच तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल. तुम्हाला मोबाइलवर मेसेजच्या माध्यमातून माहिती देण्यात येईल.