Coronavirus : गुजरातमध्ये का होतायेत जास्त मृत्यू, जाणून घ्या तज्ञ काय सांगतात ?

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : संपूर्ण जग सध्या कोरोना व्हायरस साथीच्या आजाराशी झुंज देत आहे. भारतातही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना विषाणूमुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या राज्यांमध्ये गुजरात देखील आहे. गुजरातमध्ये आतापर्यंत 133 लोकांचा मृत्यू झाला आहे. तज्ञ आणि डॉक्टरांच्या मते, राज्यात मृत्यूच्या वाढत्या संख्येचे कारण कोरोना विषाणूचा एल स्ट्रेन होऊ शकतो. शनिवारी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्या उपस्थितीत डॉ. अतुल पटेल यांनी माध्यमांना याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, गुजरातमधील वाढत्या मृत्यूच्या संख्येचे कारण चीनमधील वुहानचा ओरिजनल स्ट्रेन असू शकतो, तर एस स्ट्रेनची उपस्थिती केरळमधील मृत्यूदर कमी होण्यामागील कारण असू शकते.

एल स्ट्रेन आणि एस स्ट्रेन म्हणजे काय?
डॉ. अतुल पटेल यांनी माध्यमांना सांगितले की, कोरोना विषाणूचे दोन वेगवेगळे स्ट्रेन आहेत. एक म्हणजे एल स्ट्रेन आहे तर दुसरा एस स्ट्रेन. यापैकी एल स्ट्रेन हा चीनच्या वुहानचा ओरिजनल स्ट्रेन आहे. या विषाणूचा परिणाम अत्यंत प्राणघातक आहे. एल स्ट्रेनमुळे लवकर मृत्यू देखील होतो. वुहान नंतर एल स्ट्रेनच्या म्युटेशनने एस स्ट्रेन बनले. हे तुलनेने कमी प्राणघातक आहे. मी केरळच्या शासकीय वैद्यकीय सल्लागाराशी बोलत होतो, ज्यांनी सांगितले की बहुतेक रुग्ण दुबईहून आले आहेत, तिथे एस स्ट्रेन आहे. त्यामुळे केरळमधील कोरोनाचा प्रभाव बर्‍याच प्रमाणात कमी झाला आहे. त्याच वेळी गुजरातमध्ये अमेरिका आणि युरोपियन देशांहून अधिक लोक येत आहेत, जिथे एल स्ट्रेन सामान्य आहे. त्यामुळे गुजरातमध्ये एल स्ट्रेन होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मृतांचा आकडा जास्त आहे.

आतापर्यंत भारतात सापडले तीन स्ट्रेन
आतापर्यंत भारतात कोरोना विषाणूंचे तीन स्ट्रेन सापडले आहेत. यामध्ये चीन, अमेरिका आणि युरोपमधील स्ट्रेन समाविष्ट आहे. आयसीएमआरच्या म्हणण्यानुसार या तिघांमध्ये फारच कमी फरक आहे. चांगली गोष्ट म्हणजे हा विषाणू पटकन बदलत नाही. डॉ. अतुल पटेल यांनी गुजरातमधील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येमागे रूग्णांमध्ये मधुमेह आणि उच्चरक्तदाब यासारख्या आजारांचे कारणही दिले. पल्मोनोलॉजिस्ट पार्थिव मेहता म्हणतात की, लक्षणांवर विलंब होणारी प्रतिक्रिया हे देखील एक कारण असू शकते ज्यामुळे मृत्यू 6 ते 24 तासांच्या आत घडतात. मीडिया ब्रिफिंगमध्ये उपस्थित असलेल्या काही डॉक्टरांनी सरकारला आवाहन करत म्हटले की, ‘डॉक्टरांमध्ये आत्मविश्वास निर्माण करायला हवा जेणेकरून ते त्यांचे क्लिनिक उघडतील. यासह कोविड केअर सेंटर, पीपीई सुट आणि बेड्ससाठीही अधिक व्यवस्था करावी.

भारतात कोरोना विषाणूचा वाढतोय प्रादुर्भाव
दरम्यान, संपूर्ण जग कोरोना विषाणू या साथीच्या रोगाने झगडत आहे. जगभरात त्याची प्रकरणे सतत वाढत आहेत. आतापर्यंत जगभरात 28 लाखाहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे आणि 1 लाख 97 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतातही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढून 26496 झाली आहे, तर 824 लोकांचा मृत्यू झाला आहे.