Coronavirus : ‘कोरोना’चा ‘हाहाकार’ ! परदेशातून येणार्‍या सर्व नागरिकांचा व्हिसा 15 एप्रिलपर्यंत ‘रद्द’

नवी दिल्ली : वृत्त संस्था  – कोरोना व्हायरसची लागण होणार्‍यांची वाढत चाललेली संख्या लक्षात घेऊन भारत सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. परदेशातून येणार्‍या सर्वांचा व्हिसा १५ एप्रिलपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय १३ मार्चपासून लागू करण्यात येणार आहे.

देशात आतापर्यंत किमान ६७ लोकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हे लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक आदेश काढून सर्व व्हिसा रद्द करण्यास सांगितले होते.

परदेशी राजनितीज्ञ, संयुक्त राष्ट्र, आंतरराष्ट्रीय संघटना, रोजगार आणि अन्य कारणासाठी येणार्‍या सर्वांचा व्हिसा १५ एप्रिलपर्यंत निलंबित राहणार आहे. हा आदेश १३ मार्च २०२० पासून भारतातून जाणार्‍या पहिल्या विमान उड्डाणापासून लागू होणार आहे. या दरम्यान कोणी परदेशी व्यक्तीला भारतात यायचे असेल तर त्याने आपल्या जवळच्या भारतीय दुतावासाशी संपर्क साधावा, असे या आदेशात म्हटले आहे.