26 वर्षीय कोरोना वॉरियरने गमावला जीव, कर्तव्यनिष्ठेला मुख्यमंत्र्यांनी केला सलाम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या देशामध्ये सगळीकडे कोरोनाचा ( Corona) कहर पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येने ९२ लाखांचा टप्पा पार केला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी आणि डॉक्टर्स अहोरात्र मेहनत घेऊन कोरोनाग्रस्तांची सेवा करत आहेत. हे लोक आपल्या कुटुंबापासून दूर राहून कोरोनाच्या संकटात आपले कर्तव्य पार पाडताना दिसत आहेत. हे कर्तव्य पार पाडत असताना अनेक कोरोना वॉरियर्सना (Corona Warriors) देखील कोरोनाची लागण झाली. काहींनी त्यावर यशस्वीरित्या मातदेखील केली, तर काहींना आपला जीव गमवावा लागला आहे.

अशीच एक घटना मध्य प्रदेश (Madhya Pradesh) मध्ये घडली आहे. यामध्ये अनेक रुग्णांचा जीव वाचवणाऱ्या एका कोरोना वॉरियरचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या संकटात रुग्णांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या धडपडणाऱ्या 26 वर्षीय डॉक्टरला कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. डॉ. शुभम उपाध्याय ( Dr.Shubham Upadhya) असे कोरोनमुळे मृत्यू झालेल्या डॉक्टरचे नाव आहे.

कोरोना रुग्णांवर उपचार करता करता त्यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला. भोपाळच्या चिरायू रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात येत होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्रकृती अचानक खालावली आणि त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. या डॉक्टरच्या मृत्यूवर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीदेखील ट्विट करून शोक व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून हे ट्विट केले आहे. “मनाला खूप वेदना होत आहेत, खूप दुःख होत आहे. आमचा निर्भीड कोरोना योद्धा डॉ. शुभम कुमार उपाध्याय, जे निःस्वार्थ वृत्तीने अहोरात्र सेवा करून कोरोना रुग्णांनी सेवा करताना संक्रमित झाले. त्यांनी आज आपले प्राण गमावले आहे” असे शिवराज सिंह चौहान यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

“डॉक्टर होताना जी शपथ दिली जाते, त्यातील प्रत्येक शब्द डॉ. शुभम यांनी सार्थकी लावला. देशाचा एक खरा नागरिक असल्याचंदेखील त्यांनी दाखवून दिलं आहे. भारतमातेच्या अशा सुपुत्राला मी श्रद्धांजली अर्पण करतो. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. मला आणि संपूर्ण मध्य प्रदेशला डॉ. शुभम यांचा अभिमान आहे. आम्ही त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत. मी आणि मध्य प्रदेश सरकार डॉ. शुभम उपाध्याय यांच्या कुटुंबासोबत आहोत” असेदेखील शिवराज सिंह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.