‘कोरोना’मुळे पुण्यातील शिक्षण अर्थसाखळीला 5 हजार कोटींचा फटका

पोलिसनामा ऑनलाईन टीम – शिक्षणाचे देशातील महत्त्वाचे केंद्र असलेल्या पुण्यात कोरोनामुळे बाहेरून येणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रमाण 25 टक्क्यांपर्यंत घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील शिक्षण अर्थसाखळीला तब्बल 5 हजार कोटींचा फटका बसणार आहे.

शिक्षणासाठी राज्यभरातून, परराज्यातून आणि परदेशातून विद्यार्थी येण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. पुण्याबाहेरील विद्यार्थ्यांचे प्रमाण 25 टक्क्यांपर्यंत कमी होईल, असा अंदाज आहे. या घटणार्‍या विद्यार्थीसंख्येमुळे अर्थसाखळीला फटका बसण्याबरोबरच अनेकांचे व्यवसाय धोक्यात येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. पुणे आणि परिसरात जवळपास 13 विद्यापीठे आणि राष्ट्रीय शिक्षण संस्था आहेत. त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांसह परराज्यातील आणि परदेशातील विद्यार्थी मोठ्या संख्येने शिक्षणासाठी येतात. त्याशिवाय स्पर्धा परीक्षा, सनदी लेखापाल, कंपनी सचिव अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीही विद्यार्थी शहरात येतात. त्यामुळे शिक्षण क्षेत्राच्या अनुषंगाने मोठी आर्थिक उलाढाल होत असते.

शिक्षणसंस्थांतील पुण्याबाहेरून येणार्‍या विद्यार्थ्यांचा टक्का लक्षात घेता या क्षेत्राशी संबंधित अर्थसाखळी जवळपास पाच ते आठ हजार कोटींची आहे. मात्र, कोरोना संकटामुळे ही अर्थसाखळी कमकुवत होणार आहे. विद्यार्थ्यांचा घटणारा टक्का आणि अर्थसाखळीवरील परिणामाबाबत ‘चिंता व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यामुळे अर्थसाखळीतील वार्षिक योगदान किमान पाच-सहा हजार कोटींचे आहे. खानावळी, सदनिका भाडयाने देणे आदी छोटे व्यवसाय विद्यार्थ्यांवर अवलंबून आहेत. विद्यार्थीसंख्या घटल्याने सर्व घटकांना मोठा फटका बसणार आहे.’