Coronavirus : भारतात ‘कोरोना’ चे कमी रूग्ण असण्याचं नेमकं आणि खरं कारण काय ?, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला दुसर्‍या क्रमांकाचा देश भारतात कोरोना व्हायरसच्या रूग्णांची संख्या कमी करून सांगितली जात आहे की, टेस्ट कमी प्रमाणात केल्या जात आहेत, ज्यामुळे रविवारपर्यंत समोर आलेल्या रूग्णांची संख्या केवळ 110 आहे?

जर तुम्हाला ताप आणि सर्दीसारखे कोरोना व्हायरसची लक्षणे असतील, आणि तुम्हाला दिल्लीतील कोणत्याही सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन कोरोना व्हायरसची टेस्ट करायची असेल तर तुम्हाला परत पाठवले जाईल.

दिल्ली सरकारच्या आरोग्य सचिवांची सहायक डॉक्टर ऋुतू सांगते की, प्रथम कोरोना व्हायरससाठी सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाइनला फ़ोन करावा लागेल.

डॉक्टर ऋुतूने सांगितले, हेल्पलाइनवर तुम्हाला अनेक प्रश्न विचारण्यात येतील, जसे की, तुम्ही अलिकडच्या काळात एखादा परदेशदौरा केला होता का, किंवा अशा एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात आला होतात का, जो परदेशातून आला आहे? किंवा या आजाराने ग्रस्त एखाद्या व्यक्तीला भेटला होतात का? जर उत्तर होय असेल तर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये पाठवून टेस्ट केली जाईल. आणि उत्तर नाही असेल तर तुमचा विचार केला जाणार नाही.

या डॉक्टरने सांगितले की, याबाबतीत दिल्ली सरकार केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाद्वारे फंडेड संस्था इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या गाईडलाईननुसार काम करत आहे.

आयसीएमआर गाईडलाईनमध्ये म्हटले आहे की, प्रामुख्याने हा आजार परदेश प्रवास करणार्‍या किंवा पॉझिटीव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्याने होतो. यासाठी सर्व व्यक्तींची टेस्ट करू नये.

टेस्टच कमी होत आहेत

कोरोना व्हायरससाठी भारतात केंद्रीय हेल्पलाईन नंबर 011-23978046 आहे. याशिवाय प्रत्येक राज्यांचा वेगवेगळा नंबर आहे.

दिल्लीतील महाराणी बागची एक महिला काही दिवसांपासून ताप आणि खोकल्याने पीडित असल्याने राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये गेली. तिला कोरोना व्हायरसची टेस्ट करायची होती.

ती एका गरीब कुटुंबातील असून नुकतीच बिहारवरून आली आहे. तिची टेस्ट करण्यास नकार देण्यात आला. परदेश दौरा केलेला नाही, आणि ताप व खोकला असेल तर कारोना व्हायरसच आहे असे समजणे जरूरी नाही, असे सांगून हॉस्पिटलवाल्यांनी तिला परत पाठवले.

कोरोना व्हायरसची टेस्ट करण्याच्या सरकारच्या या प्रणालीमुळे आरोग्य तज्ञ चिंताग्रस्त आहेत. एक अरबपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशात कोरोनाच्या टेस्ट खुप कमी केल्या जात आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे.

टेस्टची पद्धत

आशिया आणि ओशिनियामधील डॉक्टरांच्या संघटनेचे (सीएमएएओ) अध्यक्ष डॉक्टर केके अग्रवाल हे या पद्धतीशी असहमत आहेत.

त्यांचे म्हणणे आहे की, ही पद्धत रेस्ट्रिक्टिव्ह (सीमित करणारी) आहे. दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि सिंगापुरमध्ये लिबरल पद्धतीने उपचार केले जात आहेत. तेथे कोरोना व्हायरसची लक्षणे आढणार्‍या प्रत्येक रूग्णाची सरकारी आणि खासगी रूग्णालयात टेस्ट केली जात आहे.

डॉक्टर अग्रवाल यांची संस्था दक्षिण कोरियाशी देखील संबंधित असल्याने ते तेथील डॉक्टरांच्या सतत संपर्कात आहेत. भारतात सुद्धा दक्षिण कोरियाचे मॉडल वापरले पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे.

रूग्ण संख्या कमी सांगितली जात आहे का?

डॉक्टर अग्रवाल यांनी सांगितले की, मी असे म्हणणार नाही. रूग्ण संख्या कमी करून सांगण्याचा अर्थ असा आहे की, जर रूग्ण 100 आहेत तर तुम्ही 60 ची माहिती देत आहात. परंतु, येथे तर टेस्टच कमी केल्या जात आहेत, ज्यामुळे कमी रूग्ण सापडत आहेत.

डॉक्टर अग्रवाल यांचा अंदाज आहे की, जर भारताने दक्षिण कोरियाचे मॉडेल वापरले तर रूग्ण संख्या 5000 पर्यंत पोहचू शकते.

त्यांनी म्हटले की, अधिक रूग्ण समोर आले तर काय प्रॉब्लेम आहे?, ही काही वाईट गोष्ट नाही.

दक्षिण कोरियात प्रत्येक 50 लाख लोकसंख्येवर 3692 लोकांची टेस्ट केली जात आहे. इटलीत प्रत्येक 10 लाख लोकसंख्येवर 826 लोकांची टेस्ट केली जात आहे.

परंतु, भारतात आतापर्यंत काही हज़ार लोकांचीच टेस्ट झाली आहे. देशात कोरोना व्हायरससाठी टेस्ट करण्यासाठी किटची संख्या लोकसंख्येच्या तुलनेत खुपच कमी आहे.

या घातक आजारामुळे आतापर्यंत दिल्लीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे आणि संपूर्ण भारतात केवळ दोन लोकांचा मृत्यू झाला आहे.

परंतु, संपूर्ण जगात या आजाराने आतापर्यंत 6,000 लोकांचा बळी घेतला आहे.

कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी दिल्ली सरकारने जिम, नाईट क्लब, स्पा आणि 50 पेक्षा जास्त लोकांच्या गर्दीवर 31 मार्चपर्यंत बंदी आणली आहे.