Pune : 40 कोरोनायोध्दांनी उम्मत संस्थेच्या माध्यमातून वर्षभरात केले 1250 अंत्यविधी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासनही सुविधा पुरवण्यास असमर्थ ठरत आहे. गेल्या वर्षांपासून कोरोनामुळे अनेकांनी आपला जीव गमावला आहे. अशा परिस्थितीत मृत्यू होत असताना शेजारी, जवळचे नातेवाईक सुद्धा अंत्यविधीसाठी पुढे येण्यास घाबरत आहेत. अशातच पुण्यातील उम्मत ही संस्था पुढाकार घेऊन लोकांची जात धर्म न पाहता स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अंत्यविधी करण्यास सुरुवात केली. गेल्या दीड वर्षांपासून संस्था हे काम करत असून आतापर्यंत 1250 अंत्यविधी केले आहेत.

याबाबत उत्तमनगर येथील संस्थेचे कार्यकर्ते जिशान कुरेशी म्हणाले की, उम्मत ही संस्था दीड वर्षांपासून कार्यरत आहे. जावेद खान हे संस्थेचे अध्यक्ष असून त्यांच्या पुढाकारातून ही संस्था सुरु केली आहे. कोणत्याही अपेक्षेशिवाय हे काम सुरु आहे. आज संस्थेसोबत 40 कार्यकर्ते जोडले गेले आहेत. संस्थेच्या माध्यमांतून आतापर्यंत 1250 अंत्यविधी केले आहेत. ज्यात हिंदू, मुस्लिम, लिंगायत अशा सर्व समाजाच्या लोकांचा समावेश आहे. संस्थेला पुणे पालिकेकडून पीपीई किट, मोजे, पायमोजे असा किट दिला जातो. शहरात ज्या रुग्णालयात रुग्णांचा मृत्यू झाला त्याची माहिती दिली जाते. ती मिळताच संस्थेच्या व्हाट्सअप ग्रुपवर त्याचे नियोजन करून कार्यकर्ते तिथे पाठवले जातात. ज्या ठिकाणी जवळचे नातेवाईक साथ सोडून जातात. अशा ठिकाणी संस्थेचे कार्यकर्ते मोठ्या हिमतीने पुढे येत आहेत. संस्थेमध्ये तरुण वर्ग आणि प्रौढ व्यक्ती देखील कार्यरत असल्याचे कुरेशी म्हणाले.