Lockdown ! आता जाऊ द्या ना घरी ! ‘कोरोना’च्या संकटामुळे मजूरवर्ग अडकला ‘कात्री’त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मागिल काही वर्षांपासून बांधकाम क्षेत्र हक्काचा रोजगार मिळण्याचे साधन बनले आहे. शहर, उपनगर आणि लगतच्या गावांमध्ये प्रचंड प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे ग्रामीण भागासह परराज्यातील अनेकांनी रोजगारासाठी पुणे शहराकडे धाव घेतली आहे. दरम्यानच्या काळात शहर आयटी हब झाले. आणि बांधकाम क्षेत्र आणखी विस्तारले. त्यातच नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर आणि लक्झरियस घरांना मागणी वाढली लागली. त्यासाठी कुशल आणि अकुशल कामगारांची गरज भासू लागली. बांधकाम क्षेत्राला चांगले दिवस आले असतानाच कोरोनाचे संकट उभे ठाकले. याचा फटका मजुर वर्गाला बसला. आता जाऊ द्या ना घरी, अशी आर्त हाक मजूरवर्ग देत आहे.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मागिल दीड महिन्यापासून देशभर लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाल्याने बांधकाम क्षेत्रासह सर्वांचीच मोठी अडचण झाली आहे. रेल्वे, एसटीसह खासगी प्रवासी वाहनेही बंद आहेत. त्यामुळे रोजगार नाही आणि गावाकडेही जाता येत नाही, अशा िद्वधा मनस्थितत कामगार वर्ग अडकला आहे.

मागिल काही वर्षांपासून ग्रामीण भागासह परराज्यातील तरुणांचा लोंढा कामानिमित्त शहराकडे येत आहे. त्यांना रोजगार मिळत आहे आणि बांधकाम व्यवसायाला आवश्यक असणारा कुशल आणि अकुशल मजूरवर्ग मिळत आहे. त्यमुळे अनेकांनी भाड्याच्या घरामध्ये आपला सुखी संसार येथेच सुरू केला आहे. काहींनी स्वमालकीची घरे खरेदी केली आहेत, तर अनेकांनी उपनगरालगतच्या गावात अर्धा-एक गुंठा घरेसुद्धा बांधली आहेत. मजूर वर्गाच्या सुखी संसाराला कोरोनाच्या संकाटाचे गालबोट लागले आणि त्यांची गावाकडे जाण्यासाठी आता घालमेल सुरू झाल्याचे पाहावयास मिळत आहे. आम्हाला आमच्या माणसांमध्ये जाऊ द्या, अशी आर्जवी हाक प्रशासनाकडे ते देत आहेत.

इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी अडकून पडलेले मजूर सर्वेक्षणासाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोर व्यथा मांडत आहेत. सर्वच मजुरांना गावी जाण्याचे वेध लागले आहेत. काम नाही, तर गावी तरी जाऊ द्या अशी आर्जवी हाक देत अधिकाऱ्यांना साकडे घालत आहेत. पुणे शहरासह उपनगर आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू आहेत. याठिकाणी काम करणारा मजूरवर्ग मोठा आहे. महापालिकेच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरू आहे. त्याचवेळी त्यांच्याशी संवादही साधला जात असल्याने मजूर आपल्या भावना व्यक्त करत आहेत.

पुणे महापालिकेने शहरासह उपनगरातही निराधारांची जेवण आणि राहण्याची सोय केली आहे. मात्र, महसुली अधिकाऱ्यांकडून सर्वेक्षणादरम्यान येथील मजुरांच्या निवासाची व्यवस्था, त्यांना मिळणाऱ्या सुविधा, अन्नाची व्यवस्था, सुका शिधा, आरोग्य व्यवस्था आणि त्यांच्या मानसिक आरोग्याची पाहणी केली जात आहे. या मजुरांनीही या अधिकाऱ्यांसमोर त्यांच्या समस्या आणि प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. कामे सुरू झाल्यास आर्थिक नुकसान टाळणे शक्य होईल, अशी व्यथाही त्यांनी मांडली. शारीरिक अंतर राखून कामे सुरू करणे शक्य असल्याने अशा कामांना परवानगी देण्याचा आग्रहही त्यांच्याकडून धरला जात आहे.

लॉकडाउनमुळे अडचणी

परराज्यातून एकाच कुटुंबातील तीन ते चार भाऊ एकाच वेळी येत येतात. ते उपनगर आणि परिसरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कामावर राहतात. हडपसर, वाघोली, कोंढवा, कात्रज, फुरसुंगी, लोणी काळभोर, उरुळी कांचन, कदम वाकवस्ती, चंदननगर, खराडी, येरवडा, विश्रांतवाडी, मुंढवा, केशवनगर अशा वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडलेल्या कुटुंबातील नातेवाईकांना एकत्र येत नाही. त्यामुळे कुटुंबापासून वेगळे राहण्याची वेळ या मंडळींवर आली आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांतून आलेल्या मजुरांना वाहतूक व्यवस्था नसल्याने गावी जाता येत नाही. सोलापूर, बार्शी, पंढरपूर, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, अकोला, अमरावती, मराठवाडा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आदी ठिकाणचे मजूर घरी जाण्याची उत्सूक आहेत. घरी कोणत्याही परिस्थितीत राहू, परंतु घरी जाऊ द्या, असे ग्रामीण भागासह परराज्यातील मजूर सांगत आहेत.