कोरोनाने गोव्याची बिकट अवस्था ! ऑक्सिजनअभावी आणखी 13 जणांचा मृत्यू

पणजी : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा संसर्ग गोव्यात वाढू लागला आहे. गुरुवारी पहाटे दोन ते सहा यावेळेत बांबोळीच्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन रुग्णालयात (गोमेकॉ) ऑक्सिजनअभावी १३ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यँत या रुग्णालयात २७ जण दगावले असून काही रुग्णांचा अन्य कारणाने मृत्यू झाला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गुरुवारी गोव्यातील मृत्यू सत्र थांबत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. तत्पूर्वी गोमेकॉमध्ये ११ मे आणि १३ मे रोजी ऑक्सिजनअभावी अनुक्रमे २६ व १५ रुग्णांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनामुळे गोव्यातील विविध रुग्णालयांमध्ये दररोज ६० ते ७० जणांचा मृत्यू ओढवत आहे. १३ महिन्यात सुमारे दोन हजार जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. या मृत्यू सत्रामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

दरम्यान, शुक्रवारी काँग्रेसचे केंद्रीय नेते रणदीप सुरजेवाला यांनी ट्वीट करत गोव्यातील परिस्थितीवर भाष्य केले. गोव्याची अवस्था बिकट झाली आहे. दिवसाढवळ्या कोरोनाबाधितांचे खूनच होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे गोव्याचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांची हकालपट्टी करायला हवी अशी मागणी त्यांनी केली आहे.