Coronavirus : अकोल्यात कोरोनाचा पहिला संशयीत रूग्ण आढळल्यानं राज्यात प्रचंड खळबळ

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात कहर माजवणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे लोक भीतीच्या छायेत आहेत. भारतात देखील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून 34 वर पोहोचली आहे त्यात आता अकोल्यात कोरोनाचा पहिला संशयित रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या रुग्णावर सर्वोपचार रुग्णालयात कोरोना आयसोलेशन वार्डमध्ये उपचार सुरु आहेत. मूळ अकोल्यातील रहिवासी असलेली 24 वर्षीय तरुणी जर्मनीत नोकरीसाठी गेली होती. दोन दिवसांपूर्वी ती जर्मनीहून भारतात परतली. यावेळी ती पुण्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली होती. त्यानंतर ती थेट अकोल्यात पोहोचली.

घरी आल्यावर तरुणीला त्रास होण्यास सुरुवात झाली. प्रकृती खालावत असल्याने आपल्याला कोरोनाची लागण तर झालेली नाही ना या संशयाने तरुणी शनिवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास थेट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या म्हणजेच सर्वोपचार रुग्णालयातील कोरोना आयसोलेशन वार्डमध्ये दाखल झाली. डॉक्टारांनी कोरोनाची लक्षणं आढळल्याने तरुणीवर तत्पर उपचार सुरु केले. सध्या या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे.

नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवले –
कोरोना आयसोलेशन वार्डमध्ये दाखल होताच रुग्णाच्या घशातील श्वासाचे नमुने घेण्यात आले, यानंतर हे नमुने तपासणीसाठी तात्काळ पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. आता हा तपासणी अहवाल येण्यास दोन दिवसांचा अवधी लागेल.

कोरोनाचा एक संशयित रुग्ण दाखल झाला आहे. त्यावर उपचार सुरु असून नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले आहेत. दोन दिवसात तपासणी अहवाल आल्यानंतर पुढील उपचार सुरु करण्यात येतील. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळवे. योग्य ती प्रतिबंधात्मक उपाय योजना करावी असे जीएमसी अकोलाचे अधिवक्ता डॉक्टर शिवहरी घोरपडे यांनी सांगितले.