Coronavirus : बीडमध्ये कोरोनाचा पहिला बळी

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे चिंता वाढली आहे. राज्यातील सुरक्षीत जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीड जिल्ह्यात सोमवारी (दि.18) पहाटे एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. मुंबईवरून शनिवारी (दि.16) परतलेल्या दोन रुग्णांनंतर रविवारी (दि.17) पुन्हा सात रुग्ण आढळले होते. नगर जिल्ह्यातील पिंपळगाव हुडा येथील एक कुटुंब मुंबईत वास्तव्यास होते.

नगर जिल्हा कोरोना रिस्क असल्याने हे कुटुंब मुंबईहून जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे नातेवाईकांकडे आले होते. दोन बालकांसह सात जणांना कोरोना असल्याचे समोर आले होते. यातील 65 वर्षीय व्यक्तीचा आज पहाटे मृत्यू झाला. त्यामुळे सुरक्षीत जिल्हा असलेला बीड जिल्हा हादरून गेला असून जिल्ह्यातील हा पहिला मृत्यू आहे.

दरम्यान, नगर जिल्ह्यातील पिंपळगाव येथील मूळ रहिवासी असलेले सातजण मुंबईत होते. सध्या नगर कोरोना रिस्क जिल्हा आहे. त्यामुळे सेफ असलेल्या बीड जिल्ह्यातील सांगवी येथील पाहुण्यांकडे येण्याचा त्यांनी पास मिळवला. त्याद्वारे 13 तारखेला जिल्ह्यात आलेल्या या सातजणांना सर्दी खोकला अशी लक्षणं आढळली. अखेर त्यांना कोरनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.

गावे बफर झोन म्हणून घोषीत
आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे कोरोनाची लागण झालेले सात रुग्ण आढळून आले आहेत. बीड जिल्ह्यातील इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 चे कलम 144 नुसार आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण गावापासून तीन किलोमीटर परिसरातील सांगवी पाटण, खिळद, पाटण, कोहीनी, कारखेलतांडा हा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात येत आहे. त्यापुढील चार किलोमीटर परिसरातील लिंचोडी, धामणगाव, सुर्डी, कारखेल ब्रु, डोईठाण, वाची, लाटेवाडी वमहाजनवाडे ही गावे बफर झोन म्हणून घोषित करण्यात येत आहेत.

संपर्कातील 56 जणांचे स्वॅब तपासणीला
गेवराई तालुक्यातील इटकूर येथील एक व माजलगाव तालुक्यातील हिवरा येथील एक असा दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर लोकांचा प्रशासनाने शोध घेतला आहे. हिवरा येथील कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात 47 तर इटकूर येथील कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात 9 अशा 56 जणांचे थ्रोट स्वॅब रविवारी उशिरा घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.