Coronavirus : दिलासादायक ! महाराष्ट्रातील ‘या’ 12 जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोनामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली असताना एक दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. केंद्रीय आरोग्य विभागाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, औरंगाबाद, जळगाव सह १२ जिल्ह्यांमध्ये नव्या रुग्णांचा आकडा घटताना दिसत असल्याचे सांगितले. केवळ महाराष्ट्रच नाहीत तर देशातील १३ राज्यात कोरोनाच्या नव्या रुग्णांचा वाढता आलेख कमी होत आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये नवी रुग्ण संख्या कमी होत जाईल असा विश्वासही अग्रवाल यांनी यावेळी व्यक्त केला.

पत्रकार परिषदेत लव अग्रवाल यांनी पाच आठवड्यांचा आलेख सादर केला. या आलेखानुसार महाराष्ट्रातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, औरंगाबाद, जळगाव, नांदेड, लातूर, नंदूरबार, वाशिम, भंडारा, धुळे आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये नव्या रुग्णांची नोंद कमी झाल्याचे दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. काही दिवसापासून राज्याच्या दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख पाहता त्यामध्ये वाढ होत नसल्याचे दिसते. दुसरऱ्या लाटेत महाराष्ट्रात १८ एप्रिलला ६८ हजार ६३१ नवे रुग्ण आढळले होते. त्यानंतर २ मे रोजी ५६ हजार ६४७ नवे रुग्ण आढळले होते. यावरुन नव्या रुग्णांमध्ये घट होतांना दिसत आहे.४ ते १७ एप्रिल या कालावधीत बहुतांश जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या सर्वोच्च बिंदूवर पोहोचल्याचे आढळले. त्यानंतर त्यात घट झालेली आहे.

या राज्यांमध्येही रुग्णसंख्येत घट

महाराष्ट्राबरोबरच देशाती काही राज्यांमध्ये रुग्ण संख्या घटताना दिसत आहे. त्यामध्ये दिल्ली, छत्तीसगढ, पंजाब, गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दमण आणि दिव, लक्षद्वीप आणि लडाख आदी राज्यांचा समावेश आहे. गेल्या १५ दिवसापासून या ठिकाणी रुग्णसंख्येत घेत होत आहे. परंतु अलीकडेच हि घट दिसली असल्याने त्या आधारे काही बोलणे घाईचे ठरेल, असे लव अग्रवाल म्हणाले. रुग्ण संख्या घटात आहे हे चांगले संकेत आहेत. रुग्णसंख्या घटविण्यासाठी या स्थितीत जिल्हा आणि राज्य पातळीवर सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे असेही त्यांनी सांगितले.

चिंता कायम

आरोग्य विभागाने सादर केलेल्या आलेखावरून १२ राज्यांमध्ये नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाली असल्याचे दिसत असले तरी महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, हरयाणा, उत्तर प्रदेश, बिहार, पश्च‍िम बंगाल, छत्तीसगढ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ व तामिळनाडू या राज्यांमध्ये १ लाखांहून अधिक सक्रीय रुग्ण आहेत. तर सात राज्यांमध्ये सरासरी ५० हजार ते १ लाख सक्रीय रुग्ण आहेत. २२ राज्यांमध्ये पॉझिटीव्हीटी दर हा १५ टक्क्यांहून अधिक आहे. दरम्यान महाराष्ट्रात सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत निर्बंधातून सूट देण्यात आली आहे. याचा फायदा घेत लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे. सर्वच शहरांमध्ये रोज सकाळी ११ पर्यंत हीच स्थिती आहे. त्यामुळे प्रश्न पडतो, आपल्याला कोरोनाला रोखायचंय की वाढू द्यायचंय?