Corona Virus : इराणमध्ये ‘कोरोना’चा हाहाकार, 230 भारतीय विद्यार्थी अडकले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इराणमध्ये कोरोना व्हायरसचा फैलाव वाढला असून तेथील शिराज विद्यापीठ बंद करण्यात आले आहे. त्यामुळे काश्मीरी विद्यार्थी-विद्यार्थीनी अडकून पडले आहेत. या कॅम्पसमध्ये ७० भारतीय विद्यार्थी राहतात. तर संपूर्ण इराणमध्ये किमान २३० विद्यार्थी अडकून पडले आहेत.

कोरोना व्हायरसमुळे इराणमध्ये आतापर्यंत ४३ जणांचा मृत्यू झाला असून ५९३ जणांना त्याची बाधा झाली आहे. इराणची राजधानी तेहरान येथील युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेस, अन्य कॉलेजमध्ये २३० काश्मीरी विद्यार्थी अडकले आहेत.

तेहरानमधून एक विद्यार्थी उमेद परवेज याने सांगितले की, २५ फेब्रुवारीला आम्ही येथून निघणार होतो. परंतु, सरकारने येथील सर्व विमान उड्डाणे रद्द केली आहे. विमानतळ सील करण्यात आले आहे. आम्हाला काय करावे हे समजत नाही. इराणने सर्व विमानसेवा बंद केली असल्याने आता भारत सरकारकडून जर इराण सरकारशी बोलणी करुन विमानसेवा उपलब्ध झाली तरच या अडकलेल्या विद्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी काही उपाय योजता येणे शक्य होणार आहे.