Coronavirus : पश्चिम बंगालमधील काँग्रेस उमेदवाराचा रुग्णालयातच मृत्यू

कोलकत्ता : वृत्तसंस्था –   देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. आत्तापर्यंत हजारो जणांना कोरोनाची लागण झाली तर शेकडो कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पश्चिम बंगालमधील निवडणुकीमध्येही कोरोनाने शिरकाव केला आहे. काँग्रेसच्या उमेदवाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

रेजाउल हक असे या उमेदवाराचे नाव आहे. काँग्रेसकडून त्यांना मुर्शिदाबादमधील शमशेर गंज विधानसभेची उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, त्यांना कोरोनाची लागण झाली. ही बाब समजल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचारही सुरु होते. उपचारादरम्यान गुरुवारी सकाळी त्यांचा कोलकता येथील एका रुग्णालयात मृत्यू झाला. याबाबतची माहिती पश्चिम बंगाल काँग्रेसचे सचिव रोहन मित्रा यांनी ट्विट करून दिली.

दरम्यान, मंगळवारी एकूण 42,214 नमुन्यांची तपासणी केली. त्यापैकी 4,817 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले. याचवेळी 2,278 बाधितांनी कोरोनावर मात केली. पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत 5,84,740 रुग्णांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती पश्चिम बंगाल आरोग्य विभागाने दिली आहे.