Coronavirus : पुण्यात ‘कोरोना’चा दुसरा बळी, 50 वर्षीय महिलेचा ससूनमध्ये मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. भारतात देखील कोरोनामुळं अनेकांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात कोरोनाचा दुसरा बळी गेला आहे. कोरोनाची लागण झालेल्या एका 50 वर्षीय महिलेचा आज (गुरूवार) ससून रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 3 दिवसांपुर्वी पुण्यातील एका खासगी रूग्णालयात कोरोनामुळं एका 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यामुळं पुण्यात कोरोनामुळं मृत्यू झालेल्यांची संख्या आता 2 वर पोहचली आहे.

मृत्यू झालेल्या महिलेला 1 एप्रिल रोजी ससून रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी महिलेला न्युमोनिया असल्याचं निदान झालं होतं. त्यावेळी तात्काळ त्यांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. आजच त्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यामध्ये कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. गुरूवारी उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मृत्यू झालेली महिला ज्या परिसरात रहावयास होती त्या परिसरातील आणि तिच्या कुटूंबातील अन्य कोणासाठी तिचा संपर्क झाला होता काय याबाबत तपास घेण्यात येत आहे.