‘कोरोना’चे ‘सुपरस्प्रेडर’ घटक शिक्षक, PMP कर्मचारी आणि व्यावसायिकांच्या ‘Test’ करण्यास सुरुवात : अति. मनपा आयुक्त रुबल अग्रवाल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोनाचा संसर्ग वाढवण्यासाठी सुपर स्प्रेडर म्हणून कारणीभूत ठरणार्‍या घटकांची कोरोना तपासणी सुरू करण्यात आली आहे. शिक्षकांपाठोपाठ पीएमपीचे चालक- वाहक आणि व्यावसायिकांचीही तपासणी करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली.

देशभरात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दिल्ली, राजस्थान, गुजरातमधील काही शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने लॉकडाउन आणि संचारबंदीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. राज्य शासनानेही या राज्यातून येणार्‍या प्रवाशांची तपासणी केल्याशिवाय त्यांना प्रवेश न देण्याचे आदेश आजच दिले आहेत. या पार्श्‍वभूमीवर पुणे महापालिकेने संभाव्य लाट रोखण्यासाठी आतापासूनच उपाययोजना सुरू केल्या आहेत. यासंदर्भात माहिती देताना अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल म्हणाल्या, कोरोनाचा प्रसार करण्यास कारणीभूत ठरणार्‍या घटकांची कोरोना चाचणी घेण्यास सुरुवात केली आहे. आजपासून शाळा सुरू होणार होत्या, त्यामुळे मागील काही दिवसांपासून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या तपासण्या सुरू करण्यात आल्या आहेत.

पीएमपी सेवा सुरू करण्यात आली आहे. पीएमपीच्या चालक व वाहकांचीही तपासणी करण्यासोबतच आजच पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र जगताप यांच्यासोबत चर्चा झाली आहे. यानंतर शहरातील छोट्या व्यावसायिकांची तपासणी करण्यात येणार आहे. नागरिकांनी लक्षणे दिसताच तपासणी करून घ्यावी. शक्यतो कामाशिवाय गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, मास्क वापरावा, सॅनिटायजरचा वापर करावा, असे आवाहनही अग्रवाल यांनी केले.

महापालिकेच्या वतीने सध्या सीओईपीच्या मैदानावर उभारण्यात आलेले जंबो कोविड हॉस्पिटल, डॉ. नायडू रुग्णालय आणि बाणेर कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. कोरोनावरील उपचारांसाठी दोन खासगी रुग्णालयांसोबत नव्याने करार करण्यात आले असले तरी अद्याप त्या ठिकाणी रुग्ण पाठविण्यात येत नाहीत. शासन आणि महापालिकेने उभारलेल्या वरील रुग्णालयात मोफत उपचार करण्यात येत आहे. यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या दरापेक्षा साधारण ३० टक्के खर्च कमी येत आहे. काही रुग्णांवर राज्य शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचार करण्यात आले आहेत. साधारण १ कोटी रुपयांची बिले शासनाला सादर करण्यात आली आहेत. बहुतांश बिले मान्य झाली असून, शासनाकडून पहिल्या टप्प्यात २५ लाख रुपयेदेखील महापालिकेत जमा झाल्याचे अग्रवाल यांनी नमूद केले.