Coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा तिसरा बळी, पुण्यात 40 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

पिंपरी :  पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अशातच पुण्यातील गुलटेकडी भागातील रहिवाशी असलेल्या एका ४० वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा बुधवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या महिलेवर पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू होते. बारा दिवसांत शहरात कोरोनाने तिसरा बळी घेतला आहे. याबाबतची माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे.

पिंपरी चिंचवड मधील कोरोनाबाधित मृतांचा आकडा ३ वर

पिंपरी-चिंचवड शहर कंटेनमेंन्ट झोन म्हणून घोषित केले आहे. दिनांक 9 एप्रिलला एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर सोमवारी निगडीतील 62 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता त्यानंतर आज वायसीएम मध्ये उपचार घेत असलेल्या पुण्यातील महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे तिघांचा मृत्यु झाला आहे.

याबाबत बोलताना आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पुण्यातील गुलटेकडी येथील महिलेला अ‍ॅडमिट केले होते. उपचारादरम्यान बुधवारी रात्री या महिलेचा मृत्यू झाला. तर आज तीन जण पॉझिटिव्ह आढळले असून त्यात दोन महिला आणि एक पुरुषाचा समावेश आहे. महिलांचे वय 40 आणि 45 असून पुरुषाचे वय 50 आहे. हे रुग्ण दापोडी, वाकड आणि गुलटेकडी येथील आहे.’

पिंपरी चिंचवड मध्ये कोरोनाबाधितांची संख्या 68 वर

कंटेनमेंट झोन जाहीर केल्यानंतरही पिंपरी चिंचवड शहरात दररोज नवनवीन प्रकरणे समोर येत आहेत. गुरुवारी तीन नवीन रुग्ण मिळाल्यानंतर गुरुवारी आणखी एक रुग्ण आढळला. यामुळे शहरात कोरोनाची लागण होण्याची संख्या 68 झाली आहे.