धक्कादायक ! ‘शिक्षक’ महाशयांमुळं 8 जणांना ‘कोरोना’ची लागण, 4 विद्यार्थी देखील पॉझिटिव्ह

जव्हार : पोलीसनामा ऑनलाइन –  काही दिवसांपूर्वी न्याहाळे येथील शासकीय आश्रमशाळेत जाऊन १०६ विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करणारा शिक्षक पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. त्या शिक्षकाच्या संपर्कातील चार विद्यार्थी, तीन कर्मचारी व एक पालक असे आठ जणांचे चाचणी अहवाल नुकतेच पॉझिटिव्ह आले आहेत.

Advt.

सदरील शिक्षक हा प्रतिबंधित इमारतीत राहत होता. याआधी त्या इमारतीत एक रुग्ण आढळून आला होता. त्याच शाळेतील एका कर्मचाऱ्याला गावाकडे जायचे म्हणून तपासणी केली असता तो पॉझिटिव्ह आला. याच दरम्यान हा शिक्षक त्या कर्मचाऱ्याच्या संपर्कात आला आणि संपर्कातून संपर्क होत गेला व न कळत शाळेत पुस्तक वाटप करण्यात आले होते. ग्रामीण आदिवासी भागात देखील कोरोना संसर्गाचा प्रभाव वाढला असून, त्यात आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्यात आल्याची बाब अतिशय गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे.

१०६ विद्यार्थी व त्यांच्या कुटुंबातील अशा एकूण २५० जणांची कोरोना संसर्ग चाचणी करण्यात आली. यामधील चार विद्यार्थ्यांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हे विद्यार्थी १४ ते १५ वयोगातील आहेत. तसेच शाळेतील तीन कर्मचारी व एक पालक अशा एकूण आठ जणांना लागण झाल्याचे निष्पन्न झाले.