Coronavirus : रत्नागिरीत ‘कोरोना’चा पहिला बळी, 4 पॉझिटिव्ह

खेड/रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – कोकणात देखील कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोकणात कोरोनाचा हा पहिलाच बळी असून 4 जण पॉझिटिव्ह आहेत. खेड येथील कोरोना रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला हा व्यक्ती दुबईहून खेड येथे आली होती. खेड रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.

खेड तालुक्यातील कळंबणी येथील शासकीय रुग्णालयात या व्यक्तीला 6 एप्रिलला दाखल करण्यात आले होते. त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून रत्नागिरीत कोरोनाचा पहिला बळी ठरला आहे. रत्नागिरीत आतापर्यंत 4 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून गुहागर येथील पॉझिटिव्ह रुग्ण पूर्णपणे बरा झाला आहे. तर 2 रुग्णावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मृत झालेला हा रुग्ण दुबईहून भारतात आला होता. त्यानंतर खेड येथे आला होता. कोरोनामुळे रुग्ण मृत्यू होण्याची कोकणातील पहिलीच घटना आहे. यामुळे प्रशासनानं तात्काळ अलसुरे गाव सील केले असून तेथील लोकांचा सर्व्हे करण्याचे काम सुरु आहे. कोकणातील पहिल्या मृत्यूमुळे प्रशासन सतर्क झाले असून सर्व यंत्रणा कार्यान्वीत करण्यात आली आहे.

मृत व्यक्तीला खेड रुग्णालयात कोणी भेटायला गेले असेल तर त्या व्यक्तीने तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात संपर्क साधावा. तसेच दापोली तालुका न सोडण्याचे आवाहन केले आहे. शहर, गाव सोडू नका. ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी सुरक्षित रहा. दापोली तालुक्यात इतर तालुक्यातील कोणालाही प्रवेश दिला जाणार नसल्याचे तहसीलदार समीर घारे यांनी सांगितले.