वधू पिताच ‘कोरोना’ पॉझिटिव्ह विवाह सोहळ्यात 200 जण, 24 जणांना ‘लागण’ !

उस्मानाबाद : पोलिसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना शासनाच्या दिलेल्या आदेशाला जुगारून थाटात विवाह सोहळा पार पडल्यानंतर वधू पिताच कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या विवाह सोहळ्याला उपस्थितीत असणाऱ्या 24 जणांना लागण झाली असून, 11 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. पोलिसांनी सर्वांवर गुन्हे दाखल केले आहेत. जिल्ह्यातील भूम तालुक्यात राळेसांगवी गावात हा प्रकार घडला आहे. त्यामुळे उपस्थित असणाऱ्या शेकडो जणांत भीतीचे वातावरण झालं आहे.

याप्रकरणी ग्रामसेवक सुषमा स्वामी यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार वधू पित्यासह 200 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. प्रशासनाने विवाह सोहळ्याला 50 पेक्षा अधिक व्यक्ती जमवू नये आदेश दिले आहेत. विवाह सोहळ्याला परवानगी घेणे बंधनकारक केले आहे. पंरतु या विवाह सोहळा विना परवाना पार पडला आहे.

भूम तालुक्यातील राळेसांगवी गावात (दि. 29 जून) एका वधू पित्याने विवाह सोहळा आयोजित केला होता. पण ज्या वधू पित्याने हा सोहळा आयोजित केला होता तोच कोरोना बाधित निघाला आणि वऱ्हाडी मंडळी यांच्यासह आयोजकात एकच खळबळ उडाली. या वधू पित्याच्या संपर्कात आलेल्या 24 जणांचा आतापर्यंत अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आला असून आणखी 11 जणांचा अहवाल येणे प्रलंबित आहे. त्यामुळे भूम तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आता येथे उपस्थित असणाऱ्यांचा शोध घेण्याचे काम सुरू केले आहे. पोलिसांनी आता आयोजक व वधू पित्यासह 200 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांना झाल्यानंतर जाग येते…

उस्मानाबाद जिल्ह्यात दररोज विवाह सोहळे व इतर कार्यक्रम पार पडत आहेत. अनेकवेळा परवानगी देखील घेतली जात नाही. अंत्यविधीला 20 लोक आणि विवाह सोहळ्याला 50 लोक जमविण्याची परवानगी असताना या ठिकाणी शेकडो लोक जमत आहेत. परंतु पोलीस याकडे दुर्लक्ष करत आहेत. यानंतर काही प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांना जाग येते. कळंब तालुक्यात देखील एका समाजाचा सार्वजनिक कार्यक्रम थाटात पार पडला. पण याकडे पोलिसांनी “हातओले” झाल्यानंतर दुर्लक्ष केल्याची चर्चा तालुक्यात आहे.