Coronavirus : मुंबईत पुन्हा 1 कोटींचे ‘मास्क’ जप्त !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी वापरण्यात येणार्‍या मास्कचा मोठा साठा विले पार्ले व सहार पोलिसांनी पकडला आहे. सहार गावातील कार्गो सर्व्हिस रोडवर वरील गोदामात १ कोटी रुपयांचे ४ लाख मास्क पोलिसांनी जप्त केले आहेत. सहार पोलीस ठाण्याने जीवनावश्यक वस्तू कायद्याखाली ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

विले पार्ले पोलिसांनी सहार गावातील गोदामात बेकायदेशीररित्या मास्कचा साठा करुन ठेवल्याची माहिती मिळाली. त्यानुसार विले पार्ले व सहार पोलिस पथकाने शहा वेअर हाऊजींग व ट्रान्सपोर्ट गोडावून या ठिकाणी छापा मारला. तेथे २०० बॉक्समध्ये तब्बल ४ लाख मास्कचा साठा करुन ठेवला होता. या मास्कची १ कोटी रुपये किंमत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून दिवसेंदिवस लोकांकडून मास्कची मागणी वाढत आहे. अशावेळी काळाबाजार करण्यासाठी हा साठा करुन ठेवण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी सुमारे १५ कोटी रुपयांचे २५ लाख मास्कचा साठा पकडला होता. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १४ एप्रिलपर्यंत संपूर्ण देशात लॉक डाऊन करण्यात आले आहे. या काळात कोणीही जीवनाश्यक वस्तूंचा साठा करुन ठेवू नये, असे पोलिसांनी आवाहन केले आहे.