Coronavirus : औरंगाबादमध्ये ‘कोरोना’ची शंभरी, बाधितांची संख्या 105 वर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून मराठवाड्याची राजधानी असले्ल्या औरंगाबाद शहरातील बाधितांची रुग्णसंख्येने शंभरी ओलांडली आहे. शहरातील एकुण रुग्ण संख्या 105 वर पोहचली आहे.

सोमवारी शहरात 29 रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यानंतर रुग्ण संख्या 82 वर पोहचली होती. त्यानंतर मंगळवारी 23 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता रुग्ण संख्या 105 झाली आहे.

शहरातील ज्या भागात रुग्णसंख्या अधिक आहे, त्या भागात संचारबंदी अधिक कडक करण्याच्या सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल्या आहेत. जिल्हा रुग्णालय, तसेच वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अडचणींबाबतही त्यांनी चर्चा केलेली. त्यांच्याकडे पीपीई कीटची मागणी अधिकार्‍यांनी नोंदवली आहे. मंगळवारी राज्यात कोरोनाचे 522 नवे रुग्ण आढळले असुन, 27 जणांचा बळी गेला आहे. याचबरोबर आजच्या तारखेपर्यंत करोनाबाधितांची संख्या 8 हजार 590 झाली. कोरोनामुळे 369 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूदर 4.30 टक्के झाला आहे.