Coronavirus : पाकिस्तानमध्ये ‘मशिदी’ बनल्या ‘कोरोना’चा अड्डा, मौलानांनी 194 मशिदीमध्ये एकत्र केली ‘गर्दी’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि कट्टरपंथी उलेमा यांच्यात रमजानमध्ये मशिदी उघडण्यासाठी झालेल्या कराराची ऐशीतैशी केली जात आहे. कोरोनामुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या पंजाबमधील ८० मशिदींच्या उलेमांनी केवळ उघडपणे गर्दी जमविली नाही तर सामाजिक अंतराच्या नियमांचेही पालन केले नाही. दुसरीकडे, पाकिस्तानच्या सर्वोच्च इस्लामिक वैद्यकीय संस्थेने इशारा दिला आहे की, मशिदी कोरोनो विषाणूच्या संसर्गाचा आधार बनत आहेत. म्हणून लोकांनी त्यांच्या घरात नमाज आणि तारावीह पठण करावेत.

माहितीनुसार, सर्वाधिक प्रभावित पंजाबच्या प्रांतातील जवळपास ८० मशिदींमध्ये नियमांचे उघड उल्लंघन झाले आहे. शुक्रवारी आणि शनिवारी लोक केवळ मशिदींमध्येच नमाज पठण करण्यासाठी जमले नाहीत तर, गर्दीमुळे लोक रस्त्यावर नमाज आणि ताराविह अदा करताना दिसले. सरकारने मशिदी उघडण्याच्या अटींनुसार लोकांना ६ फूट अंतर ठेवण्याचे आवाहन केले होते. मात्र त्याउलट, लोक रमजानच्या निम्मिताने मिठी मारताना आणि त्यांचे अभिनंदन करताना दिसले. केवळ पंजाबच नव्हे तर इस्लामाबाद, सिंध, खैबर पख्तून आणि कराचीसारख्या शहरांच्या १९४ मशिदींमध्ये अशी छायाचित्रे आली आहेत, जिथे नियमांकडे दुर्लक्ष केले गेले. यातील ८९ मशिदींमध्ये लोकांनी मास्क घातलेला नव्हता. आणि नियमांचे उल्लंघन करत मुलांना नमाज पठण करण्यासाठी आणले होते.

मजबुरीने सरकारने दिली परवानगी
रविवारी पाकिस्तानमध्ये कोविड -१९ च्या घटनांची संख्या वाढून १३,१०५ झाली आहे. शनिवारी पाकिस्तान इस्लामिक मेडिकल असोसिएशनचे (पीआयएमए) अध्यक्ष डॉ. बर्ने यांनी पत्रकारांना सांगितले की, गेल्या आठवड्यात संक्रमित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. एका महिन्यात कोरोनो विषाणूची सुमारे ६,००० प्रकरणे नोंदवली गेली आहेत. परंतु गेल्या सहा दिवसांत ती दुप्पट झाली आहेत.’ येत्या मे आणि जूनमध्ये संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक वेगाने वाढेल असा इशारा त्यांनी दिला. बर्णे म्हणाले की, सरकारी रुग्णालयांच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यांनी हे कबूल केले की पाकिस्तान सरकारने कट्टर मौलवींसमोर गुडघे टेकवताना रमजानच्या वेळी मशिदींमध्ये सशर्त नमाज अदा करण्यास मजबुरीने परवानगी दिली आहे.

राष्ट्रपतींनी पुन्हा केले आवाहन
रमजानच्या वेळी मशिदींमध्ये नमाज पठण करण्याची परवानगी देण्यासाठी राष्ट्रपती आरिफ अल्वी आणि शीर्ष मौलाना यांच्यात ठरवलेल्या २० अटींचे पूर्ण पालन केले गेले नाही. अल्वी यांनी अटींचा हवाला देत मशिदींच्या इमामांना पत्र लिहून विनंती केली कि, त्यांनी ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना त्यांच्या घरी प्रार्थना करण्याचे आवाहन करावे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी मशिदी प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी अल्वी यांनी रावळपिंडीतील मशिदींनाही भेट दिली.

रविवारी पाकिस्तानमध्ये एकाच दिवसात कोरोना विषाणूच्या संसर्गाची १,५०८ नवीन प्रकरणे नोंदविली गेली आहेत. आतापर्यंत १३,३०४ लोकांना संसर्ग झाल्याची पुष्टी आहे. आरोग्य मंत्रालयाच्या मते, गेल्या २४ तासात कोरोना विषाणूमुळे १८ जणांचा मृत्यू झाला असून, देशातील मृतांची संख्या २७२ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत २९३६ रुग्ण संसर्गमुक्त झाले आहेत.