Coronavirus : चिंताजनक ! पुण्यात आणखी 2 ‘कोरोना’बाधित महिलांचा मृत्यू, महाराष्ट्रातील बाधितांची संख्या 1895 वर

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना व्हायरसमुळं देशातील तसेच राज्यातील परिस्थिती चिंताजनक आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत जात असल्यामुळं महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी लॉकडाऊन हा 30 एप्रिलपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे ही दोन शहरं कोरोनासाठी हॉटस्पॉट बनत आहेत. शनिवारी मुंबईत कोरोनामुळुं 11 जणांचा मृत्यू झाला होता. आज (रविवार) पुण्यात कोरोनामुळं 2 महिलांचा मृत्यू झाला आहे. ही पुणेकरांसाठी चिंतेची बाब आहे. शासकीय आकडेवारीनुसार पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमध्ये एकुण 267 कोरोनाबाधित आहेत. पुणे शहरात 225, पिंपरीत 30 तर पुणे ग्रामीणमध्ये 12 कोरोनाबाधित आहेत.

कोरोनामुळं आज मृत्यू झालेल्यांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटवरून दिलेल्या माहितीनुसार संगमवाडी परिसरातील 58 वर्षीय आणि सोमवार पेठेतील 56 वर्षीय महिलेचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. दोन्ही रूग्णांना कोरोनाशिवाय इतर आजारही होते. पुण्यातील मृतांचा आकडा देखील दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपा प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासन जोरदार प्रयत्न करीत आहे. पोलिसांनी काही भाग संपुर्णपणे सील केले आहेत तर काही ठिकाणी कर्फ्यू देखील लावण्यात आला आहे.

राज्यात ‘कोरोना’चे 134 नवे रूग्ण, महाराष्ट्रातील संख्या 1895 वर

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात कोरोनाचे तब्बल 134 नवीन रूग्ण आढळून आले असून आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1895 वर जाऊन पोहचली आहे. त्यामध्ये सर्वाधिक 113 रूग्ण मुंबईत आढळून आले आहेत. मुंबई सर्वाधिक हॉटस्पॉट बनली आहे.

नवीन आढळलेल्या रूग्णांपैकी 113 मुंबईत, रायगड, अमरावती, भिवंडी, पिंपरी-चिंचवडमध्ये प्रत्येकी 1 रूग्ण आढळून आला आहे. पुणे शहरात 4 आणि मिरा भाईंदरमध्ये 7 रूग्ण आढळून आले आहेत. नवी मुंबई, ठाणे आणि वाशी-विरारमध्ये प्रत्येकी 2 रूग्ण आढळून आले आहेत. आता महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1895 वर जाऊन पोहचली असल्याचं राज्याच्या आरोग्य विभागानं सांगितलं आहे.