Coronavirus : पुण्यात आणखी 2 तर बुलढाण्यात एक नवीन ‘कोरोना’बाधित, राज्यातील संख्या 338 वर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात आज आणखी दोन नवीन कोरोना बाधित आढळून आले असून बुलढाण्यात एक जण नव्याने आढळला आहे. पुण्यात बुधवारी रात्रीपर्यंत ३९ कोरोनाबाधितांची संख्या होती. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची संख्या ३३८ इतकी झाली आहे. पुणे जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या ५४ झाली आहे. त्यापैकी १७ जण बरे झाले असून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. बुलढाण्यात आणखी एक कोरोना बाधित आढळून आला आहे. त्यामुळे बुलढाण्यातील कोरोना बाधितांची संख्या ५ वर गेली आहे. २८ मार्च रोजी मृत्यु पावलेल्या व्यक्तीच्या अत्यंत जवळच्या संपर्कातील ही व्यक्ती आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयाने २९ मार्च रोजी पाठविलेल्या ३२ नमुन्यांपैकी प्रतिक्षेत असलेल्या ३ नमुन्यांचे अहवाल बुधवारी रात्री उशिरा मिळाले. त्यातील एका जण पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मृत व्यक्तीसह बुलढाणा येथे ५ जण कोरोना बाधित झाले आहे. सध्या विलगीकरण कक्षात २१ जणांवर उपचार करण्यात येत आहे.  आज पॉझिटिव्ह आढळून आलेली व्यक्ती येथील टिळकवाडी जुना गाव परिसरात राहणारी आहे. शहरातील हाय रिस्क असलेल्या झोनमधील १६ हजार नागरिकांपैकी १३ हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.