Coronavirus Lockdown : ‘लॉकडाऊन’दरम्यान फिरणार्‍यांना पोलिसांनी समजवलं, न ऐकणार्‍यांचे केले ‘असे’ हाल (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन टीम – कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाविना 14 एप्रिलपर्यंत घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. असे असतानाही गांभीर्य लक्षात न घेता देशातील अनेक भागांमध्ये नागरिक मजा म्हणून बाहेर फिरताना पाहायला मिळत आहेत. वारंवार सांगूनही पोलिसांच्या आवाहनाला आणि सरकारच्या सूचनांचा अनादर केला जात आहे. सध्या सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.


दोन तरुण गाडीवरून फिरायला जाण्याचा बेतात असताना पोलिसांनी पकडले होते. सुरुवातीला पोलिसांनी प्रेमाने आणि साध्या सोप्या भाषेत या तरुणांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र हे तरुण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यानंतर पोलिसांनी दांडक्याचा वापर करण्याचा प्रयत्न केला असता दोन तरुणांनी दांडका पकडून अरेरावीची भाषा केली. विनाकारण दादागिरी दाखवून हुज्जत घालणार्‍या या तरुणांना पोलिसांनी एकाची मानगुटी तर दुसर्‍याची कंबर धरून खेचत पोलीस ठाण्यात घेऊन गेले. त्यानंतर पोलिस ठाण्यातून बाहेर निघताना दोन तरुणाची बोबडी वळली होती.देशभरात सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. कोरोनाग्रस्तांची संख्या आज 193 वर पोहोचली आहे. पुण्यात 1, मुंबईत, 4 सांगलीमध्ये 1 तर नागपुरात 1 असे नवीन 7 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.