घरगुती लग्नसोहळ्यात नवरदेवासह 23 जणांना कोरोनाची बाधा, एका वृद्ध महिलेचा मृत्यू; पुणे जिल्ह्यात प्रचंड खळबळ

जुन्नर : पोलीसनामा ऑनलाइन –  एका घरगुती लग्नसोहळ्यातील नवरदेवासह 23 पेक्षा जास्त वऱ्हाडी मंडळींना कोरोनाची बाधा झाली आहे. तर याच कुटुंबातील एका वृध्द महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यातील निमदरी येथील धोंडकर वाडीत (ता. जुन्नर) ही घटना घडली आहे. या घटनेमुळे पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेनंतर सोमवारी (दि .17) दुपारी तातडीने निमदरी ग्रामस्थ व कोरोना समितीच्या कार्यकर्त्यांनी तातडीची बैठक घेऊन गाव पुढील काही दिवस लॉकडाऊन घोषित केले आहे.

सध्या लॉकडाऊनमध्ये लग्न सोहळ्याला फक्त 25 वऱ्हाडी मंडळींना परवानगी आहे. त्यामुळे धोंडकर वाडीतील ऋषिकेश धोंडकर व आरती फोडसे यांचा 4 मे रोजी घरीच साध्या पध्दतीने लग्नसोहळा आयोजित केला होता. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी 5 मे ला सत्यनारायण महापूजा आयोजित केली होती. यानिमित्ताने नातेवाईक व पाहुणे यांची गर्दी झाली होती. लग्नानंतर 2 दिवसांनी नवरदेव मुंबईला जाऊन आला होता. त्यानंतर नवरदेवाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने लग्न सोहळ्याला उपस्थित असलेल्या नातेवाईकांची टेस्ट केली. लेण्याद्री येथील कोविड सेंटरला टेस्ट केलेल्या 40 जणांपैकी बारा जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आली असून खाजगी ठिकाणीसुद्धा10 पेक्षा जास्त जण पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णांची संख्या 23 पेक्षा जास्त वाढली आहे.