Coronavirus : चिंताजनक ! देशात 24 तासांत 2487 ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, 83 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोन व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोनाला आळा घालण्यासाठी देशात तिसऱ्यांदा लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. मात्र, असे असतानाही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. आरोग्य मंत्रालयाने रविवारी दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासात तब्बल 2487 नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर कोरोनाच्या विळख्यात आल्याने तब्बल 87 जणांचा मृत्यू झाला आहे. रोज येणाऱ्या आकड्यांचा विचार करता हा आकडा फार मोठा आहे.


आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशात कोरोनाबाधितांची संख्या 40 हजार 263 वर पोहचली आहे. यापैकी 10887 रुग्ण बरे झाले आहेत. तर 28070 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आता देशात कोरोनामुळे दगावलेल्या रुग्णांची संख्या 1306 झाली आहे.

सध्या देशात महाराष्ट्राची परिस्थिती चिंताजनक आहे. येथे कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 12 हजारावर पोहचली आहे. तर 500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दिल्लीतही कोरोनाचे नवे रुग्ण समोर येताच आहेत. बिहार, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशासह देशाच्या इतर भागात देखील कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत.